पुणे, २९ सप्टेंबर २०२०: कोरोना’चं केंद्रबिंदू ठरलेल्या पुणे जिल्ह्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली आहे. याआधी देखील पुणे जिल्हा परिषदेनं वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती केली होती. मात्र, आता पुन्हा ही भरती केली जाणार आहे. विशेष म्हणजे यंदा केली जाणारी ही भरती महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरीलही इतर राज्यांमधून देखील अर्ज मागविण्यात येणार आहे. यासंदर्भात केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये पुणे जिल्हा परिषद जाहिरात देणार आहे. पुणे जिल्हा परिषद ही एकमेव जिल्हा परिषद बाहेरच्या राज्यात जाहिरात करणार असल्याची माहिती उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी दिली.
या भरतीत डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेविका, वॉर्डबॉयसह औषध निर्माता, भूलतज्ज्ञ अशी विविध सुमारे १७७४ पदं मंजूर केली आहेत. पुणे जिल्हा पूर्ण भारतात कोरोना’च्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. शहरी भागाबरोबरच जिल्ह्यातल्या ग्रामीण भागांमध्ये देखील आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. याआधी देखील परिषदेनं अनेक वेळा जाहिराती दिल्या होत्या. मंजूर झालेली पदे भरण्यासाठी जिल्हा परिषदेनं पुर्ण महाराष्ट्रात चार वेळा जाहिरात दिल्यानंतर ११३२ पदं भरण्यात आली होती.
परंतु स्टाफ नर्स, आरोग्यसेविका आणि डॉक्टर हीच प्रमुख पदे अद्यापही मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठीच राज्याबाहेरही आता जाहिरात केली जाणार आहे. नर्सची २९९ आणि डॉक्टरांची २६० अशी एकूण ५८२ पद रिक्त आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे