मुंबई, 30 जानेवारी 2022: बॉलिवूड गायिका लता मंगेशकर देशभरातील लोकांच्या हृदयात राहतात. त्या 92 वर्षांच्या आहेत आणि सध्या त्यांना कोरोनाची लागण झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. लताजींच्या प्रकृतीबाबतचे अपडेट्सही वेळोवेळी येत असतात. लताजींना दाखल करून 20 दिवसांहून अधिक दिवस झाले आहेत आणि त्या हळूहळू बऱ्या होत आहेत. त्यांच्या तब्येतीबद्दल चाहते खूप चिंतेत आहेत. आता लतादीदींवर उपचार करत असलेले डॉ. प्रतीत समदानी यांनी लता दीदींच्या प्रकृतीबाबत ताजी माहिती दिली आहे.
लताजींच्या प्रकृतीत सुधारणा
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबद्दल बोलताना डॉ प्रतीत म्हणाले, “लताजींच्या प्रकृतीत आता थोडीशी सुधारणा झालीय. सध्या त्यांना दोन दिवस व्हेंटिलेटरच्या बाहेर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यावर अजूनही आयसीयूमध्ये नजर ठेवण्यात आली आहे. लताजींच्या चाहत्यांसाठी हे अपडेट नक्कीच दिलासा देणारे आहे. प्रत्येकजण त्यांना लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा देत आहे. चित्रपटसृष्टीतील लोकांनाही लताजींच्या प्रकृतीची चिंता आहे.
27 जानेवारीला लता मंगेशकर यांच्या नातेवाईकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गायिकेच्या तब्येतीची माहिती दिली होती आणि एक निवेदन जारी केलं होतं. त्यात लिहिलं होतं- ‘लता दीदी ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये आहेत. त्याच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. आज सकाळी त्यांना व्हेंटिलेटरवरून काढून तपासणी करण्यात आली. त्यांच्यात आता सुधारणा दिसून येते. पण तरीही त्या डॉ प्रतीत समदानी आणि त्यांच्या टीमच्या देखरेखीखाली असेल. तुमच्या सर्व प्रार्थनांसाठी आम्ही कृतज्ञ आहोत.
आशा यांनी दीदींच्या प्रकृतीवर प्रतिक्रिया दिली
लता मंगेशकर यांचे चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत आणि त्यांनी लवकरात लवकर बरं व्हावं आणि घरी परतावं, अशी त्यांची प्रार्थना आहे. काही दिवसांपूर्वी लतादीदींची बहीण आशा भोसले यांनी सांगितलं होतं की त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी घरात पूजाही केली जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे