लातूर, दि.२४ मे २०२०: लातूर एमआयडीसीमध्ये जागतिक दर्जाच्या वैद्यकीय उपकरण निर्मितीचे उदयोग उभारावेत, अशी मागणी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे. त्यांनीही या प्रस्तावाला अनुकूल प्रतिसाद दिला आहे.
महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी(दि.२३) रोजी लातूर एमआयडीसी विकासाच्या संदर्भाने लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांना सोबत घेऊन एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व इतर सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांची बैठक घेतली.
या बैठकीत प्रारंभी कोविड १९ आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर, एमआयडीसी मधील उद्योग सुरू करणे, या उद्योगातून निर्माण होणाऱ्या उत्पादनाची वाहतूक व विक्री या संदर्भाने येणाऱ्या अडचणीवर चर्चा झाली. यातील अनेक समस्या समजून घेऊन त्या तात्काळ सोडविण्याचे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले.
लातूर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यातील पाणी उपलब्धतेची समस्या लक्षात घेता या जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये कमी पाण्यावर चालणारे उद्योग सुरू करण्याच्या दृष्टीने विचार करावा, अशी मागणी पालकमंत्री अमित देशमुख यांनी केली.
न्युज अनकट प्रतिनिधी: