वाल्हे परिसरामध्ये जनावरांना लसीकरण व  टॅगिंग लावण्याच्या मोहिमेला प्रारंभ

पुरंदर, दि. ७ ऑक्टोबर २०२०: पावसाळ्यामध्ये जनावरांना गवतावरील कीटक व विषाणूंमुळे विविध प्रकारचे आजार होत असतात. या आजारांपासून जनावरांचे संरक्षण व्हावे यासाठी देशव्यापी शुन्य लाळ खुरकूत लसीकरण मोहिम व जनावरांची कायम नोंदणी होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागाच्या वतीने राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत वाल्हे (ता.पुरंदर) नजिक सुकलवाडी येथे लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली आहे.

आज सुकलवडी येथे सुकलवाडीच्या सरपंच जयश्री चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये, लसीकरण व  जनावरांच्या कानामध्ये टॅगिंग लावण्याच्या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपसरपंच धनंजय पवार, डॉ. रोहिदास पवार, चंद्रकांत यादव, विद्यार्थी राष्टवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदेश पवार, एस. आर. गायकवाड, एस. बी. भंडलकर आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. उटगे म्हणाले की, “लाळ्या खुरकत हा विषाणूजन्य आजार आहे. यामुळे गाई- म्हशींची दूध उत्पादन क्षमता घटते. बैलास हा आजार झाल्यास त्यांचे खुरे निकामी होतात. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते,

‘लाळ्या खुरकत’ची लक्षणे:

१) जनावरांना ताप येतो.
२) सातत्याने लाळ गळते.
३) खुरांना जखमा होतात.
४) जनावरांना श्वास घेण्यास त्रास होतो.
५) प्रसंगी गाई-म्हशीचा गर्भपात होऊ शकतो.

यावेळी डाॅ. प्रशांत उटगे यांनी सांगितले की, जनावरांना लसीकरण करतानाच त्यांची नोंद केली जाणार आहे. त्यामुळे लसीकरणासाठी येणाऱ्या पशुपालकांनी स्वतःचे आधार कार्ड सोबत घेऊन यावे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा