मुंबई, 10 जून 2022: गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला मिळणाऱ्या धमक्यांचं प्रकरण वेगाने पुढं जात असल्याचे दिसत आहे. मुंबई गुन्हे शाखेची कारवाई सुरू आहे. बुधवारी संपूर्ण टीम दिल्लीत पोहोचली. लॉरेन्स बिश्नोई टोळीची अनेक तास चौकशी सुरू होती. आता या बातमीवर समोर आलेल्या नवीन अपडेटमध्ये सलमान खानला धमकावण्यामागं लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचं सांगण्यात येत आहे. बिष्णोईचा सहकारी असलेल्या विक्रम बराडच्या सांगण्यावरून ही धमकी देण्यात आली होती. बराड सध्या कॅनडात आहे. यावर दहा ते बारा हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
विक्रम हा मास्टरमाईंड
मुंबईत सलमान खानला धमकी देण्यासाठी तिघेजण मुंबईत आल्याचं वृत्त आहे. तेथे त्यांची सौरभ महाकाल यांच्याशी भेट झाली. मुंबई क्राइम ब्रँचने महाकालची सुमारे सहा तास चौकशी केली, ज्यामध्ये त्याने सांगितलं की, या टोळीने सलमान खानला प्रसिद्धीसाठी धमकावले होतं. महाकालने चौकशीदरम्यान सर्व माहिती दिली आहे. पोलिसांनी पत्र देणाऱ्या व्यक्तीचीही ओळख पटवली आहे. सलमान खानला मिळालेल्या धमकीच्या पत्रामागचा मास्टरमाईंड विक्रमजीत सिंग बराड आहे. विक्रमजीत सिंग बराड हा एकेकाळी राजस्थानमधील कुख्यात गुंड आनंदपालच्या जवळ होता, पण आनंदपालच्या एन्काउंटरनंतर तो लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीत सामील झाला.
सलमान खानला धमकी देण्यामागं विक्रम बराडचा हात आहे. बराड हा राजस्थानमधील हनुमानगड येथील रहिवासी आहे. सध्या तो देशाबाहेर आहे. दोन दिवसांपूर्वी या प्रकरणी सलमान खानचीही मुंबई क्राइम ब्रँचने चौकशी केली होती. “मी गोल्डी बराडला ओळखत नाही, मी लॉरेन्स बिश्नोईला ओळखतो, तेही गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या केसमुळं. प्रत्येकाला याबद्दल जितकं जास्त माहित आहे, तितकंच मला त्यांच्याबद्दल माहिती आहे,” असं सलमान म्हणाला होता.
धमकीच्या पत्रात लिहिलं होतं, ‘सलमान खान, लवकरच तुमची अवस्था सिद्धू मूसवालासारखी होईल’. याप्रकरणी मुंबईच्या वांद्रे पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. पोलिसांनी भादंवि कलम 506 अन्वये गुन्हा दाखल केला होता. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर सलमानला धमकीचं पत्र मिळाल्यानंतर संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत सातत्यानं अपडेट्स येत आहेत. पोलीसही आता या प्रकरणी सतर्क असून या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे