नवी दिल्ली, १९ जुलै २०२३ : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना दिल्लीतल्या राऊज अव्हेन्यू न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात, राऊज अवेन्यू न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात आली असून याप्रकरणी मंगळवारी न्यायालयाने ब्रिजभूषण यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यांच्या मुख्य जामिनावर २० जुलै रोजी सुनावणी होणार आहे. सहा महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. याप्रकरणी कुस्ती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांचाही जामीन मंजूर झाला आहे.
ब्रिजभूषण यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी, कुस्तीपटूंनी अनेक दिवस दिल्लीत जंतर मंतर मैदानात आंदोलन केलं. या मोठ्या लढाईनंतर याप्रकरणात गुन्हा दाखल झाला असून हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचलं आहे. ब्रिजभूषण सिंह यांचा अंतरिम जामीन न्यायालयाने मंगळवारी मंजूर केला. याप्रकरणी त्यांना २५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर २ दिवसांचा जामीन मिळाला आहे. ब्रिजभूषण सिंह यांच्या वतीने विधीज्ञ राजीव मोहन यांनी न्यायालयात बाजू मांडत जामिनाची मागणी केली होती. राजीव मोहन हे प्रसिद्ध वकील असून ते निर्भया खटल्याच्या वेळी पहिल्यांदा प्रसिद्धीत आले होते.
सरकारी वकील म्हणून निर्भयाची बाजू मांडताना राजीव मोहन यांनी दोषींना फाशी व्हावी, अशी मागणी न्यायलयासमोर केली होती. तेच राजीव मोहन आता ब्रिजभूषण सिंह यांची बाजू मांडत आहेत. निर्भया प्रकरण हे एक ऐतिहासिक प्रकरण आहे. या प्रकरणाची देशभर चर्चा झाली होती. निर्भया प्रकरणात ४ आरोपींना दोषी ठरवण्यात आलं आणि मार्च २०२० मध्ये त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
बृजभूषण यांच्याविरोधात कनॉट प्लेसच्या पोलीस ठाण्यात २१ एप्रिल रोजी तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी २८ एप्रिल रोजी दोन एफआयआर दाखल केले होते. दोन्ही एफआयआर आयपीसीच्या कलम ३५४ अन्वये करण्यात आल्या होत्या. तसेच भादंवि कलम ३५४ ए, ३५४ डी, आणि ३४ अन्वये तक्रार दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्यात एक ते तीन वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. पहिल्या एफआयआरमध्ये सहा ज्येष्ठ कुस्तीपटूंच्या आरोपांचा समावेश आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे