मुंबई, २५ ऑगस्ट २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्याशी असलेल्या राजकीय संबंधाबाबत वक्तव्य केले आहे. अजित पवार यांच्याशी कोणतेही मतभेद नाहीत. अजित पवार हे आमचे नेते आहेत यात काही फरक नाही, राष्ट्रवादीत फूट नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. पक्षात फूट कशी पडते? राष्ट्रीय पातळीवरील मोठा गट पक्षापासून फारकत घेतो तेव्हा असे घडते, पण आज राष्ट्रवादीत तशी परिस्थिती नाही. काही नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली पण याला मतभेद म्हणता येणार नाही.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गुरुवारी पुण्यात पोहोचल्या. तेथे पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी राष्ट्रवादीतील फुटीवर मोठा दावा केला. अजित पवारांनाही त्यांनी राष्ट्रवादीचा भाग म्हटले. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार हे पक्षाचे मोठे नेते आहेत, त्यांच्यासोबतच काही नेत्यांनी पक्षातून वेगळी भूमिका घेतली आहे.
मात्र, दुसरीकडे पक्षातील एका गटाने वेगळी भूमिका घेतल्याची तक्रार सभापती राहुल नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली आहे. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून अजित पवारांसह आठ आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड