बेळगांव, १५ एप्रिल २०२३ : बेळगांव व उपनगरांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आज सकाळी बेळगांवला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागली. यामध्ये ५० ते ६० फूट उंच पाण्याचे फवारे उडून आजूबाजूच्या शिवारामध्ये पाणीच पाणी झाले. उच्च दाबाने पाणीपुरवठा केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती एल अँड टी कंपनीने दिली आहे. त्यामुळे पुन्हा बेळगांवमध्ये पाणीपुरवठा व्यत्यय निर्माण झाला आहे.
उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असते, अशा वेळी हिडकलहून बेळगांवला येणारी मुख्य जलवाहिनी खणगाव गावातील मुख्य रस्त्यावर पहाटेच्या सुमारास अचानक फुटली. यामध्ये हजारो गॅलन पाणी गळतीत वाया गेले. ही मुख्य जलवाहिनी सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान फुटली. हे पाहून गावातील ग्रामस्थ घाबरून गेले. यामुळे गावात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. दरम्यान पाण्याचा उंच फवारा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
ही माहिती एल अँड टी कंपनीचे व्यवस्थापक हार्दिक देसाई यांना मिळताच यांनी तातडीने आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून होणारा पाणी पुरवठा बंद करण्याच्या सूचना दिल्या. पाण्याची गळती नियंत्रणाखाली येताच तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर