कर्जत, २१ ऑगस्ट २०२०: तालुक्यातील वडघूल शेजारील शेरी मळा येथील पाझर तलाव क्रमांक २ ची काही दिवसांपासून गळती सुरू आहे. सदर प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आला असून, तलावाच्या खाली निंबोडी, मांडवगण, तसेच बनपिंपरी, हे गावे आहेत. भविष्यात हा तलाव जर दुर्दैवाने फुटला तर या तीनही गावांना व वाडी वस्तीनां त्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
यामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी यांची मोठ्या प्रमाणात हानी होण्याचा धोका आहे. हि बाब ग्रामस्थांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. त्या अनुषंगाने आज उपविभागीय अधिकारी भोसले, अप्पर तहसीलदार पवार मॅडम, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, कनिष्ठ अभियंता अमोल मोटेगावकर, तलाठी सोबले यांनी पाझर तलावाची पाहणी केली. लवकरात लवकर गळती थांबावी यासाठी प्रस्ताव तयार करून कामाला सुरूवात करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राम घोडके यांनी ग्रामस्थांच्या वतीने केली आहे. उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) भोसले यांनी सदर प्रस्ताव नियोजन विभागाकडे पाठवला असल्याची माहिती घोडके यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
तसेच मौजे वडघूल येथील पाझर तलाव क्रमांक १ हा सुद्धा बऱ्याच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याचे दिसून येत आहे. त्यावर काही उपाययोजना कराव्यात अशी मागणी गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. स्थानिक ग्रामस्थांची लवकरात लवकर सदर काम पूर्ण व्हावे हीच मागणी आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष