मेखळीमध्ये बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला

बारामती, दि. ४ मे २०२० : तालुक्यातील मेखळी येथील झंजेवस्ती परिसरात कुत्र्यावर बिबट्याने बुधवार (दि.३० एप्रिल २०२०) रोजी पहाटेच्या सुमारास हल्ला केला. वनविभागाने घटनास्थळी भेट दिल्यानंतर सापडलेले पायाचे ठसे बिबट्याचे असून अधिक तपास सुरु असल्याचे सांगितले.
बिबट्याच्या वावराने मेखळी व परिसरात भीतीचे वातावरण आहे. हल्ल्यानंतर देखील बिबट्याचा वावर परिसरातील शेतात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी अधिकाऱ्यांना सांगितले. खबरदारी म्हणून नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडू नये. तसेच जनावरे,पाळीव प्राणी सुरक्षित ठिकाणी बांधावेत. त्याचबरोबर रात्री शेतात जाताना हातात घुंगराची काठी ठेवावी व मोबाईल वर गाणी लावावीत असे आवाहन वनविभागाच्या वतीने केले.
मेखळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने पाळीव प्राणी व नागरिकांच्या संरक्षणासाठी परिसरात पिंजरा लावण्याची विनंती केली आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने खबरदारी म्हणून गावात दवंडी देऊन सावध राहण्याच्या सूचना दिल्या.
घटनास्थळी बारामती विभागाचे वन परिमंडळ अधिकारी त्रिंबक जराड, वनरक्षक मीनाक्षी गुरव, संध्या कांबळे, माजी उपसरपंच संजय धुमाळ,पोलीस पाटील सुभाष भोसले,शिशिर देवकाते यांनी भेट दिली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा