कन्हेर गावात बिबटयाचा वावर; एका शेळीवर मारला ताव  

माढा, २२ ऑक्टोबर २०२०: कन्हेरगाव तालुका माढा येथे कन्हेरगाव – दहिवली शिव रस्ता परिसरात बिबटयाने दहशत निर्माण केली असून बुधवारी रात्री कन्हेरगाव येथील नवनाथ रंगनाथ डोके या शेतकऱ्याची शेळी फस्त केली आहे. त्यामुळे कन्हेरगाव परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुरुवारी दुपारी दहिवली केम रोडच्या पूर्वेला सातपुते वस्तीतील एका महिलेने प्रत्यक्ष बिबट्याला पाहिल्याचे समजते. त्यानंतर बिबट्या उसात पळून गेला. तर सदर महिला घाबरून घरी पळत सुटली. गेल्या दहा दिवसात निमगाव, दहिवली, उपळवटे, कंदर, कन्हेरगाव, ढवळस, शेडशिगे, सातोली या गावातील शिवारात बिबटयाचा वावर आहे. मंगळवारी रात्री दहिवली येथील उज्वला निवास खोचरे याची शेळी बिबटयाने फस्त केली असुन या आठवड्यात निमगाव 2 दहिवली 1 व कंदर येथे दोन शेळ्या तर कन्हेरगाव येथे एक शेळी खाल्ली आहे. या परिसरात शेतकऱ्यांमधून प्रचंड घबराट पसरली असुन वस्तीवर रहाणारे शेतकरी जीव मुठीत घेउन जगत आहेत. शेतात मजूरही कामास धजावत नाहीत. शिवारे बिबटयाच्या भितीने ओस पडली असुन वन खात्याने मात्र फक्त दोन ठिकाणी बिबट्या पकडण्यासाठी सापळा लावला आहे.

गुरुवारी दुपारी कन्हेरगाव येथे डोके यांच्या वस्तीवर वनसेवक हरिभाऊ मोरे, तानाजी अटकळे, शिवाजी दळवी, अशोक यादव यांनी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता ते ठसे बिबट्याचेच असल्याचे सांगितले. या परिसरात वनखात्याने या बिबटयाचा प्रभावीपणे बंदोबस्त करून बिबट्या पकडावा व शेतकऱ्यांची बिबट्यापासून सुटका करावी अशी मागणी कन्हेरगावचे माजी उपसरपंच धनंजय मोरे दहिवलीचे सरपंच तय्यब जहागिरदार यांनी केली आहे.

बिबटयाचा बंदोबस्त करण्यात वनखाते अपयशी ठरले असुन वनखात्याच्या कारभाराविषयी शेतकऱ्यांतुन संताप व्यक्त होत आहे. सध्या पेरणीची व शेतीच्या मशागतची कामे शेतात सुरू आहेत. परंतु बिबट्या कोठेही येईल आणि हल्ला करेल यामुळे जनावरे शेळ्या कोणीही चरावयास सोडत नाहीत लहान मुले म्हातारी माणसे जीव मुठीत धरून जगत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा