बिबट्या सफारी प्रकल्प आता बारामती ऐवजी जुन्नर मध्ये, शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला अजून एक धक्का

मुंबई, १६ सप्टेंबर २०२२ : शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या अनेक प्रकल्पांना स्थगिती देण्याचा धडाका सुरू आहे. नुकतीच माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मंजुरी दिलेल्या म्हाडाच्या कामांनाही स्थगिती देण्यात आली आहे. आता गुरुवारी झालेल्या बैठकीतही एक महत्त्व पूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. बिबट्या सफारी प्रकल्पाला मुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये आंबेगव्हाण येथेच करण्याचे आदेश दिले आहेत. बिबट्या सफारी प्रकल्प हा महाविकास आघाडी सरकारने बारामतीमध्ये करण्याचा निर्णय घेतला होता. आता हा प्रकल्प जुन्नर इथे करण्याचा निर्णय घेत शिंदे सरकारने महाविकास आघाडीला आणखी एक धक्का दिला आहे.

ठाकरे सरकार असताना महाविकास आघाडीने बिबट्या सफारी प्रकल्प बारामतीमध्ये करण्या बाबतचा निर्णय घेतला होता. परंतु शिंदे सरकारने महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय बदलला आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थमंत्री असताना बारामती येथे बिबट्या सफारी प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात ६० कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा केली होती. राज्यामध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि पर्यटक आकर्षित होण्यासाठी या सफारीची योजना करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात सत्तांतर होऊन राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच महाविकास आघाडीचे अनेक निर्णय रद्द करण्यात आले आहेत. किंवा काही ठिकाणी स्थगिती देण्यात आली आहे. यातच आता शिंदे सरकारने हा प्रकल्प बारामती ऐवजी जुन्नरमध्ये करण्याची घोषणा केली आहे. यातून महाविकास आघाडीसाठी हा आणखी एक धक्का असल्याचे बोलले जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा