अकलूजच्या धवल ‘सिंह’ यांनी मारला बिबट्या

करमाळा, १९ डिसेंबर २०२०: करमाळा तालुक्यातील तिन नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला, ज्याच्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून भीतीच्या छायेखाली वावरत असलेल्या करमाळा तालुक्याने काल सुटकेचा निश्वास टाकला. अखेर वनविभागाच्या पथकाला बिबट्या चा खेळ खल्लास करण्यात यश आले. डॉक्टर धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या गोळीने बिबट्याचा अचूक निशाणा साधत मोहीम फत्ते केली

याबाबत अधिक माहिती अशी की, वांगी नं.४ रांखुडे वस्तीवर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्याला ठार करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून या नरभक्षक बिबट्यामुळे तालुक्यात दहशत पसरली होती.
अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे बारामतीचे तावरे यांचे सहकारी म्हणून ऑपरेशनमध्ये सामील झाले होते.

वांगी येथे बिबट्याला केळीच्या बागेत वेढल्यावर या बिबट्याने धवलसिंह यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. मात्र, अतिशय सावध असलेल्या मोहिते पाटील यांनी १५ फुटावर असलेल्या या नरभक्षक बिबट्यावर ३ गोळ्या फायर करीत त्याला ठार केले.

करमाळा तालुक्यासह शेजारच्या जिल्ह्यातील अनेक नागरिकांना यमसदनी धाडणारा हा बिबट्या करमाळा तालुक्याची डोकेदुखी बनून राहिला होता. लोकांना शेताला पाणी देणे, मशागतीची कामे करणे तसेच दैनंदिन व्यवहार करताना प्रचंड अडचणी येत होत्या. लोकांच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार लटकली होती. अनेक प्रयत्न करूनही बिबट्या जेरबंद होत नसल्यामुळे वनविभागाचे कर्मचारी अतिशय तणावपूर्ण वातावरणात राहत होते. काल अखेर बिबट्याचा शेवट झाल्यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे करमाळा तालुक्यातील नागरिकांकडून अभिनंदन होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा