गोल पोस्ट महाराष्ट्र बळीराजा सुखी होऊ दे मुख्यमंत्र्यांचे विठूरायाला साकडे, नगरच्या काळे दाम्पत्याला शासकीय महापूजेचा...

बळीराजा सुखी होऊ दे मुख्यमंत्र्यांचे विठूरायाला साकडे, नगरच्या काळे दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान

पंढरपूर, २९ जून २०२३ : आज पंढरपूरच्या विठुरायाची आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक शासकीय महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत मानाचा वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील काळे दांपत्याला शासकीय महापूजेचा मान मिळाला. भाऊसाहेब काळे आणि मंगल काळे हे दाम्पत्य गेल्या २५ वर्षापासून पंढरपूरची पायी वारी करत आहेत. आज त्यांना शासकीय पूजेचा मान मिळाला. विठ्ठलाची पूजा करण्याचा सर्वात आधी मान मिळाल्याने आम्ही धन्य झालो, असे पूजेचा मान मिळालेले भाऊसाहेब काळे म्हणाले. तर बा विठ्ठला… तुझ्या आशीर्वादाने बळीराजा सुखी होऊ दे, असे साकड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठुरायाला घातले.

आज पहाटेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी विठ्ठलाची महापूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत नगर जिल्ह्यातील भाऊसाहेब काळे आणि मंगल काळे यांना शासकीय पूजेचा मान मिळाला. भाऊसाहेब काळे हे २५ वर्षापासून वारी करत आहेत. देवगड ते पंढरपूर भास्करगिरी महाराज यांच्या सोबत काळे दांपत्य पंढरीची वारी करतात. भाऊसाहेब काळे व्यवसायाने शेतकरी आहेत. काल आठ तास दर्शन रांगेत काळे दांपत्य उभे होते.

श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची महापूजा झाल्यानंतर सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत आमदार भरत गोगावले, मंत्री दीपक केसरकर, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील तसेच मानाचे वारकरि भाऊसाहेब काळे आणि त्यांच्या पत्नी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काळे दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला.

पांडुरंगाची शासकीय महापूजा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांची संवाद साधला. विठ्ठलाकडे राज्याच्या भल्याचे साकड घातल्याचे ते म्हणाले. सलग दुसऱ्या वर्षी आषाढीला महापूजा करण्याची मला संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, हे राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, असे साकडे विठ्ठलाला घातल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पांडुरंगाच्या आशीर्वादाने राज्यात सगळी कामे सुरळीत सुरू आहे. पंढरपूरचा विकास आराखडा सगळ्यांना विश्वासात घेऊनच केला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version