ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या, एका एकाला काय फोडता एकदाच्या निवडणुका घ्याच, उद्धव ठाकरे यांचे सरकारला आव्हान

मुंबई, २९ जुलै २०२३ : ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेपाठोपाठ माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला हा मोठा झटका मानला जात आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाचे काय होणार? असा सवाल केला जात आहे. त्यावर स्वत: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच उत्तर दिले आहे. एका एकाला काय फोडता, हिंमत असेल तर निवडणुका घ्याच असे आव्हानच उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिले आहे.

ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रमोद शेंडे यांच्या नेतृत्वात सायन कोळीवाडा येथील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना भेटायला आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी भाजप आणि शिंदे गटाला आव्हानच दिले. ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या. एक लक्षात येतेय, कोणी गेल्यानंतर आपल्या सागराला जास्त उधाण येते. मग ते रागाचे आहे, द्वेषाचे आहे, जिद्दीचे आहे आणि जिंकण्याची इर्षाही आपली आणखी वाढतेय. त्यामुळे जे गेलेत त्यांना जय महाराष्ट्र. आता त्यांचा आणि आपला संबंध तुटला. फक्त त्यांनी गेल्यानंतर पक्षाशी गद्दारी करू नये आणि पक्षाच्या विरुद्ध काम करू नये. नाही तर आपल्याला शिवसैनिक म्हणून त्यांना दाखवावे लागेल. कोणत्याही परिस्थिती आपले बालेकिल्ले राखले पाहिजे. त्यासाठी तुम्ही समर्थ आहातच, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

कोणी शिवसेनेतून फुटला तर शिवसेनेला धक्का असे म्हटले जाते. धक्का म्हणजे उलट आपल्यात जे भरतीचे उधाण येते त्याने या लोकांना धक्का बसेल. एवढे होऊनही शिवसेना संपत नाहीये, हा त्यांना पडलेला प्रश्न आहे. शिवसेना संपत का नाही? उद्धव ठाकरे का संपत नाही? असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यांना धडकी भरली आहे. तुमची धडकी त्यांना भरली आहे. एक एक जण फोडण्यापेक्षा घ्या ना निवडणुका. एकदाच घ्या निवडणुका, असे आव्हानच ठाकरे यांनी दिले.

कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना, तुम्ही काळजी करू नका. जोरात काम करा. मी लवकरच तुम्हाला काही कार्यक्रम देणार आहे. आपण जिंकायचेच. गद्दारांना गाडायचेच हे सर्व जण बोलत आहे. मला एका गोष्टीचा अभिमान आहे. २००७ ची निवडणूक असेल. तेव्हा शिवसेनेचे काय होणार असे वातावरण होते. महापालिकेत शिवसेना जिंकणार की नाही असे म्हटले जात होते. तेव्हा आपण जिंकलो. तेव्हा अशीच गर्दी जमली होती, महिला होत्या. त्यांना आनंदाश्रू अनावर झाले होते. या अश्रूचे मोल ज्यांना कळते तोच निष्ठावान असतो. तुमच्या अश्रू आणि मेहनतीने ज्यांना ज्यांना मोठे केले. त्यांना अजीर्ण झाले ते सोडून गेले, अशी टीका उध्दव ठाकरे यांनी केली.

न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा