सरकारला दूध दरवाढीचा निर्णय घेण्यास भाग पाडू – हर्षवर्धन पाटील

इंदापूर, १ ऑगस्ट २०२० : राज्यातील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. अडचणीतील दूध उत्पादकांना मदत करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे.त्यामुळे राज्य सरकारला दुधास प्रतिलिटरला ३० रुपये दर देण्यास भाग पाडू, असा इशारा भाजपचे नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (दि.१) इंदापूर येथे दिला.

इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या वतीने दुध दर वाढीचे तहसील कार्यालय गेटसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी दूध दरवाढीच्या मागणीचे निवेदन तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी स्वीकारले. यावेळी आंदोलनस्थळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हळदीचे दूध स्टोव्हवर तयार करून त्याचे जनतेला,पोलिसांना व पत्रकारांना हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच शिल्लक दुध हे वाया न घालवता ते इंदापूर कोविड केअर सेंटर मधील रुग्णांसाठी पाठवून देण्यात आले.

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दुध दर वाढीच्या मागणीचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. तसेच २१ जुलै रोजी राज्यात सर्व तहसील कार्यालयात भाजप महायुतीच्या वतीने निवेदने देण्यात आली. तरी सरकारने अद्यापी दुधाला प्रति लिटर ३० रुपये दर जाहीर केलेला नाही. सहकारी दूध संघांकडील सर्व दुधाची खरेदी करावी, अतिरिक्त दुधाची शासनाने भुकटी तयार करावी, दुधास प्रतिलिटर १० रू. अनुदान द्यावे या मागण्यांचा निर्णय सरकारने घेतलेला नाही, सदर निर्णय होईपर्यंत भाजपचा संघर्ष चालूच राहील, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.

इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधींकडे दुग्धविकास खात्याचे मंत्रिपद आहे, मात्र त्यांच्याकडून तालुक्यातील दूध वाढीसाठी सहकार्य करणे सोडाच, उलट दूधगंगा सहकारी दूध संघ हा बंद नव्हे तर अवसायानात काढणेसाठी प्रयत्न सुरु आहेत, त्यांच्या या प्रयत्नांचा यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध केला. तसेच तालुक्याचे लोकप्रतिनिधी वनखात्याचे मंत्री असून त्यांच्या खात्याच्या अधिकाऱ्यांकडून इंदापूर तालुक्यातील १९ गावांमधील अतिक्रमणे काढणार असल्याच्या बातम्या येत आहेत, मात्र वनमंत्री यावर बोलायला तयार नाहीत. सत्ता ही तात्पुरती असते ती जनतेसाठी राबवायची असते. काठावर पास झालेल्यांनी मेरीटच्या गप्पा मारू नयेत. काठावर उत्तीर्ण झालेल्यांना आता जनता निश्चितपणे विश्रांती देईल, अशी टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली.

इंदापूर तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या १५० च्या पुढे गेली आहे, त्यामुळे शासनाने त्वरित तालुक्यात चार ते पाच ठिकाणी कोविड केअर सेंटर ची स्थापना करावी, इंदापूर केअर सेंटरमध्ये रुग्णांना पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी मी सातत्याने मागणी करीत आहे. इंदापूर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपयोजना संदर्भात राज्यमंत्री अपयशी ठरले आहेत, त्यामुळे जनता भयभीत झाली आहे, अशी टीकाही हर्षवर्धन पाटील यांनी केली.

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी इंदापूर तालुक्यात गावोगावी भाजपच्या वतीने आज दूध दरवाढीचे आंदोलन करण्यात आले. जर शासनाने दरवाढ केली नाही तर आंदोलन तीव्र करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना भाजप न्याय मिळवून देईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.

यावेळी ॲड.कृष्णाजी यादव, मंगेश पाटील, विलासराव वाघमोडे, शिवाजी मखरे, शकील सय्यद, हर्षवर्धन कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी भाजप व महायुतीतील रयत क्रांती, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), रासपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

गोमातेचे पूजन !

भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी पोलीस स्टेशन समोर आंदोलनात सहभागी झालेल्या गोमातेचे पूजन केले. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचेसह कार्यकर्ते हे सरकार विरोधात घोषणा देत बाबा चौक मार्गे तहसीलदार कार्यालय गेट समोर आले. मुक्या सरकारचा मुक्या जनावरांकडून जाहीर निषेध, मला वाचवा, ही वाक्य रचना असलेली गाईच्या अंगावरील झूल सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.


न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा