शासनाला मंदिरे उघडण्यास भाग पाडू – हर्षवर्धन पाटील

इंदापूर, दि.२९ ऑगस्ट २०२०: संपूर्ण देशामध्ये मंदिरे व धार्मिक स्थळे उघडी असताना, महाराष्ट्र राज्यातच मंदिरे व धार्मिक स्थळांना उघडण्यास बंदी घालण्यात आली आहे, ही निषेधार्ह बाब आहे. राज्य शासनाने जनतेच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तात्काळ मंदिरे सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
श्रीक्षेत्र नीरा नरसिंहपूर (ता.इंदापूर) येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री लक्ष्मी- नृसिंह मंदिरासमोर शनिवारी (दि.29) राज्यातील मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, या मागणीसाठी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करून  ‘उद्धवा दार उघड ‘ अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या केंद्र सरकारने देशातील मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिलेली आहे, त्यामुळे तिरुपती बालाजीसह देशभरातील मंदिरे व धार्मिक स्थळे सुरू करण्यात आली आहेत. राज्यात इतर सर्व व्यवहार सुरू असताना फक्त मंदिराचे दरवाजे राज्य शासनाने बंद केले आहेत. मात्र राज्यातील सर्व मंदिरे जनतेला दर्शनासाठी उघडण्यासाठी राज्य सरकारला भाजप भाग पाडेल. मार्च महिन्यांपासून मंदिरे बंद असल्याने मंदिरे असलेल्या गावातील हजारो लोकांची उपजीविका धोक्यात आली आहे, त्यामुळे शासनाने नियम व अटी घालून मंदिरे व धार्मिक स्थळे जनतेसाठी खुली करावीत, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावास तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेले निष्क्रिय मंत्री जबाबदार असल्याची टीका केली.

तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंत्र्याकडे नियोजनाचा अभाव आहे . तसेच कोरोना रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे, अशी टीका केली. यावेळी धार्मिक संघटनांच्या वतीने मंदिरासमोर भजन करण्यात आले. श्री लक्ष्मी – नरसिंह देवस्थान हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत आहे.

इंदापूर तालुका भाजपचे नूतन अध्यक्ष शरद जामदार, तानाजी थोरात, मारुती वनवे, ह.भ.प.अंकुश रणखांबे, सचिन सावंत यांची भाषणे झाली. या आंदोलनामध्ये नीरा-भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, युवराज म्हस्के, महेंद्र रेडके, महादेव घाडगे, किरण पाटील, श्रीमंत ढोले, अमरसिंह पाटील, मनोज पाटील, राम आसबे, हरिभाऊ घोगरे, बाळासाहेब मोहिते, नाथाजी मोहिते, आण्णा काळे, राजेंद्र मोहिते, हनुमंत काळे, संतोष मोरे, विलास ताटे, किशोर मोहिते, पवन घोगरे, सुभाष काळे, शंकर घोगरे, प्रदीप बोडके, अभय वांकर, भाजप कार्यकर्ते, ग्रामस्थ व धार्मिक क्षेत्रातील मंडळींनी सहभाग घेतला.

न्यूज अनकट प्रतिनिधी – निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा