मुंबई, ५ ऑक्टोंबर २०२०: सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळं मराठा समाजात प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यात आता एमपीएससी ची परीक्षा देखील लांबणीवर पडत आहे. आंदोलकांचं म्हणणं आहे की, जोपर्यंत आरक्षणाचा तेढ सुटत नाही तोपर्यंत परीक्षा घेतल्या जाऊ नयेत. त्यांना नेमक्या कुठल्या प्रवर्गात समावेश दिला जाणार आहे याबद्दल अद्याप कुठलीही माहिती नसल्यामुळं परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी आता केली जातं आहे. यासंदर्भात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनंजय जाधवांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.
पत्रात म्हंटलं आहे की, जर परीक्षा पुढं ढकलली नाही तर राज्यभर उग्र आंदोलन करण्यात येईल. ११ ऑक्टोबरला राज्यसेवेची पुर्वपरीक्षा होणार आहे. पण, त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एमपीएससीची परीक्षा पुढं ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे.
याआधी मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५ ऑक्टोबरपर्यंत घराबाहेर पडून भूमिका स्पष्ट करावी आणि मराठी आंदोलकांशी संवाद साधावा. अन्यथा येत्या ६ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर आंदोलन करू, असा तीव्र इशारा मराठा आंदोलकांनी दिला होता. मराठा आंदोलकांनी आता थेट मुख्यमंत्र्यांनाच अल्टिमेटम दिल्यानं मराठा आंदोलन येत्या काळात आणखीनच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे