शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांना त्यांच्या मुलीचे पत्र.

उस्मानाबाद, ३ ऑगस्ट २०२० : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा अतिशय झपाट्याने वाढत चाललेला आहे. या महामारी मध्ये काही लोकसेवा करणाऱ्यांना देखील कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. प्रशासन या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सतत कार्यरत आहे. अशा मध्येच, उमरगा- लोहारा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी देखील काही दिवसांपूर्वी स्वत:ची कोरोना तपासणी केली असता त्यांना देखील कोरोनाची लागण झालेली असल्याचे समोर आले आहे.

त्यांच्यावर सुरुवातीला उमरगा येथील रूग्णालयात उपचार सुरू होते मात्र, त्यांना मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबई येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आपल्या वडिलांना कोरोना झाला असल्यामुळे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मुलीने त्यांच्यासाठी एक पत्र लिहिले आहे, जे सर्व सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. तीने लिहलेले पत्र पुढील प्रमाणे ;

प्रिय बाबा,

लवकर बरे व्हा

एक राजकीय नेतृत्व म्हणून उदयास येताना तुमच्या कुठल्याही यादीतील प्रथम व अंतिम समान असतात. त्यांची मांडणी एकावर एक नसून ती समांतर असते. तुमचे कुठलेही कर्म हंगामी नसते तर ते शाश्वत असते आणि त्यात नेहमी हिताच्याच बाबींचा हिशोब असतो हे सगळे करत असताना शेवटी महामारीने सुद्धा तुमची परिक्षा पाहण्याचे ठरवले. पण, तुमच्या सारख्या लढवय्या, अनुभव आणि कणखर आरोग्याच्या आधारावर यातून नक्कीच बाहेर पडेल हा विश्वास आहे.

बाबा तुम्ही नेहमी म्हणता, ” हा देह समाजाच्या चरणावर वाहिला आहे. निर्माल्य होईपर्यंत सेवा देईन.” तुमच्या आरोग्यासाठी काहींनी देव पाण्यात ठेवले तर काहींनी नवस बोलले. तुम्ही सामान्य माणसांच्या मनात आधारवड म्हणून विराजमान आहात. मला खात्री आहे की, तुम्ही हॉस्पिटलमध्ये असून सुद्धा तेथील डॉक्टर आणि कर्मचारी यांची विचारपूस करत असाल, त्यांना काय हवयं याची सोय लावत असाल.

तरी बाबा तुम्ही लवकर बरे व्हा कारण अजून खूप जनता आपली वाट पाहत आहे. बाबा आपले काळीजच नाही तर छाताड सुद्धा वाघाच आहे, बाळासाहेबांचा आशिर्वाद आणि उद्धव ठाकरे सारखे सरसेनापती लढत असताना आपल्या सारख्या मावळ्याला नियती सुद्धा जास्त दिवस अंथरुणाला खिळून ठेवणार नाही. कोरोना एकदा येऊन जाणारा पाहुणा नाही तो नेहमी येतच राहणार त्यासाठी तुम्ही बरे होणे गरजेचे आहे. आपला मतदारसंघ तुमच्याकडे डॉक्टराच्याच नजरेने बघतोय, असा डॉक्टर जो रोग होण्याआधी माय बाप जनतेची काळजी घेतो.
तुम्ही लवकर बरे व्हा बाबा… तुम्ही लवकर बरे व्हा…

तुमची लाडकी,
आकांक्षा.

न्यूजअनकट प्रतिनिधी – प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा