परवानाधारक रिक्षा चालकांना अनुदानासाठी फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही

मुंबई, १३ मे २०२१: राज्यात लॉक डाऊन घोषित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही आर्थिक पॅकेज देखील घोषित केले होते. ज्यामध्ये रिक्षावाल्यांचा देखील समावेश करण्यात आला होता. या आधी रिक्षावाल्यांचे प्रचंड हाल झाले होते. याची दखल घेत यंदा राज्य सरकारने परवानाधारक रिक्षा धारकांना १५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, काही प्रतिनिधी संघटना परवानाधारक रिक्षा चालकांकडून मॅन्युअल पद्धतीने फॉर्म भरून घेत आहेत, अशा तक्रारी परिवहन आयुक्त कार्यालयास प्राप्त होत आहेत. याच तक्रारींची दखल म्हणून परवानाधारक रिक्षाचालकांना फॉर्म भरण्याची गरज नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

सध्याच्या कोरोनाकाळात घराबाहेर पडणे जिकरीचे आहे. तरीसुद्धा म्यॅन्युअली फॉर्म भरून घेतले जातायत. त्यामुळे या प्रकारामुळे परवानाधारक रिक्षाचालकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर आता शासनाने मोठा निर्णय घेत राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना कोणताही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही, असे सांगितले आहे.

परवानाधारक रिक्षा चालकांना कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही. त्यांना मिळणारे सानुग्रह अनुदान त्यांच्या थेट बँक खात्यात देण्यासंदर्भात काम सुरु आहे. त्यासाठी पोर्टल तयार करण्याचे काम परिवहन आयुक्त कार्यालय स्तरावर सुरु आहे. ऑनलाइन कार्यप्रणाली सुरू झाल्यानंतर सर्व संघटना तसेच रिक्षाचालकांना याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे सूचित करण्यात येणार आहे. यासाठी मॅन्युअल पद्धतीने फॉर्म भरून घेणे किंवा अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असे परिवहन उपायुक्त यांनी कळविले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा