धाराशिव, २ जून २०२३ : खरीप हंगाम सुरू होत असताना राज्यातील कृषी खाते अलर्ट मोडवर आल्याचे दिसून येत आहे. राज्यात कृषी विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील दहा कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले तर तीन केंद्राना सक्त ताकीत देण्यात आली आहे.
खरीप हंगामाच्या अनुषंगाने कृषी विभागाकडून या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना दुकानदारांना चांगलाच दणका बसल्याचे दिसत आहे. कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या या कारवाईमधील तपासणीमध्ये जादा दराने खताची विक्री करणे, ई-पॉस मशीन प्रमाणे साठा न जुळणे, परवान्यात समाविष्ट स्त्रोताव्यतिरिक्त इतर निविष्ठाची खरेदी विक्री करणे, साठा रजिस्टरला नोंद नसणे, शेतक-यांना विहीत नमुन्यात पावती न देणे याबाबत अनियमितता आढळून आली आहे. ही अनियमितता कृषी केंद्र चालकांना चांगलीच महागात पडली आहे.
राज्यात मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांना बोगस बियाणांची विक्री करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. त्याचबरोबर मालाचा तुटवडा दाखवून रासायनिक खतांची चढ्या भावात विक्री करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम कृषी केंद्र चालकांकडून सुरू होते. आता कृषी विभागाने केलेल्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी दिलासा मिळण्याची चिन्ह दिसत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर