नांदेड ४ मार्च २०२३ : गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे नांदेडच्या हिमायतनगर येथे तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी जाणाऱ्या ५२ गोवंशास जीवनदान मिळालय. आज सकाळी साधारण दहाच्या सुमारास हादगाव येथील कार्यकर्त्यांनी फोन वरून माहिती दिली की, हादगाव वरून दोन ट्रक गोवंशाचे येत आहेत. बेफाम स्पीडने येणारे हे दोन ट्रक सोनारी फाटा येथे गोरक्षक कार्यकर्त्यांनी उसाचे ट्रक आडवे लावून रोखले. सदरील माहिती हिमायतनगर पोलीस स्टेशनला कळविल्यानंतर घटनास्थळी पोलीस हजर झाले.
सदरील दोन्ही ट्रक तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी गोवंश घेऊन जात होते. ट्रक क्रमांक सी जी ०४ जेडी ५३५७ आणि एम एच ४० सी एम २७१२ दोन्ही १२ टायरचे ट्रक आहेत. यामध्ये एकुण ५२ गोवंश अतिशय क्रुरपणे चारही पाय बांधलेल्या अवस्थेत आढळुन आले आहेत. नांदेड जिल्ह्यात गेल्या महिन्यातच गोहत्या आणि गोवंश तस्करीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर पोलिस प्रशासनाकडुन हदगाव टी पाॅईंट, ऊमरी येथे मामा चौकात आणि सारखणी अशा ३ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती, तरीही हदगाव नाकाबंदी तोडुन गोवंशाची कत्तलीसाठी वाहतुक चालुच आहें. याबाबत विश्व हिंदु परिषदेच्या वतीने वरिष्ठांना हि बाब लक्षात आणुन दिली होती. तरीही गोवंशाची कत्तलीसाठी तस्करी सुरूच असल्याची प्रचीती आज पुन्हा संबंध महाराष्ट्राला आली आहे.
राज्यात गोहत्याबंदी कायदा ” प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ (सुधारीत), प्राणी अत्याचार अधिनियम आणि ईतर तत्सम कायदे असतांना देखील या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यानेच तस्करी राजरोसपणे सुरू आहे. यानंतर गोहत्या आणि गोवंशाची कत्तलीसाठी वाहतुक सुरूच राहीली तर प्रखर आंदोलन करण्यात येईल असा इशारा यनिमित्ताने किरण बिच्चेवार, नांदेड विभाग गोरक्षा प्रमुख, विश्व हिंदु परिषद देवगीरी प्रांत यांनी दिला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : गंगाधर पडवळे