घरात सापडलेल्या घोणसच्या २० पिल्लांना जीवदान

तळेगाव दाभाडे, पुणे २१ जून २०२३: मावळ तालुक्यातील आढले गावातील एका घरातून, घोणस सापांच्या २० पिल्लांना ‘वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या’ प्रसंगवधानामुळे जीवदान मिळाले. त्यांना निसर्गाच्या अधिवासात सोडून दिले आहे. आढले गावात तेजस रामदास भालेसेन यांच्या घरात ही घोणस पिल्ले मिळाली.

घराच्या आवारात, बाथरूम जवळ तेजस यांच्या आईला काही सापांची पिल्लं दिसली, त्यांनी तत्काळ वन्यजीव रक्षक मावळ संस्थेशी संपर्क साधला. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे जिगर सोलंकी व झाकीर शेख घटनास्थळी पोहोचले आणि दोन तासांत त्यांनी घोणस जातीची २० पिल्ले आणि मोठी मादी घोणस सुखरूप ताब्यात घेतली. याची माहिती त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना दिली.

घोणस जातीच्या या सापांची पिल्ले व मादी यांना निसर्गाच्या अधिवासात सोडून दिले आहे. रात्रीच्या वेळी बाहेर जाताना टॉर्च व बुटाचा वापर करावा आणि कोणताही साप न मारता जवळच्या प्राणीमित्राला किंवा वनविभागाला संपर्क करावा, असे आवाहन निलेश गराडे आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी केले.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा