मुंबई, २२ सप्टेंबर २०२०: मुंबई शहर आणि उपनगरात काल ढगाळ वातावरण होतं. ठाणे जिल्ह्यात दुपारपासून हलक्या पावसाचा जोर आता वाढला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी आणि माणगाव क्षेत्रात पावसाचा जोर कायम होता. चिताड आळी इथं पावसामुळे एका घराची संरक्षक भिंत कोसळली. आंबोली इथल्या मुख्य धबधब्याजवळ दरड कोसळल्यामुळे या मार्गावर एकेरी वाहतूक सुरु आहे. आंबेरी तसंच होडावडे पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातील कडसावंगी ते येसेगाव या दरम्यानचा रस्ताच काल ओढ्याला आलेल्या पुराने अक्षरशः वाहून गेला असून, या रस्त्यावरील वाहतुक ठप्प झाली. गेल्या कित्येक वर्षांपासून या ओढ्यावरील पुलाचे काम करावे, अशी मागणी दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी सातत्याने केली. मात्र, ती मागणी त्यांची पूर्ण होऊ शकली नाही. नाशिकमधे दुपारपासून मुसळधार पाऊस पडत होता.
नाशिक जिल्ह्याच्या काही भागात काल दुपारी जोरदार पाऊस झाला. विशेषत: नाशिक शहराला तीन ते चार तास पावसाने झोडपून काढले. शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण शंभर टक्के भरले असले तरी त्यातून विसर्ग करण्यात आला नाही. मात्र, गोदावरी नदीला पाणी वाढले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: