मुंबई, ४ जुलै २०२३: रविवारपासून महाराष्ट्रात सुरू झालेल्या राजकीय घडामोडीनंतर, शिवसेनेप्रमाणेच आता राष्ट्रवादीचेही दोन तुकडे झाले आहेत. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून गेल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी अंतर्गतच नवा पक्ष आणि संघ तयार केलाय. एवढेच नाही तर आज दुपारी त्यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन होतय.
राष्ट्रवादीत अजित पवारांनी खासदार सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष बनवले आहे. सोमवारी अजित पवार आणि ९ आमदारांच्या शपथविधीनंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांसह ९ आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली. खासदार प्रफुल्ल पटेल, शिवाजीराव गर्जे, विजय देशमुख आणि नरेंद्र राणे, या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्यांनाही पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, आज मंगळवार, ४ जुलै रोजी शरद पवार यांची त्यांच्या घरी मीटिंग आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हटवल्यानंतर जयंत पाटील हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. दुसरीकडे आज राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. मात्र, शरद पवार यांची भेट घेऊनच ते राजीनामा देतील.
सोमवारी रात्री शरद पवार यांनी वकिलांची बैठक घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस आता बंडखोरांचा मुद्दा न्यायालयात नेऊ शकते, असे वृत्त आहे. आज काँग्रेसची उच्चस्तरीय बैठकही होणार आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्याबाबत चर्चा होणार आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी ही बैठक बोलावली आहे. काँग्रेस आता विरोधी पक्षातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे, त्यामुळे त्याला विरोधी पक्षाचा दर्जा मिळायला हवा, असे थोरात यांनी यापूर्वीच म्हटले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड