पुणे, २८ डिसेंबर २०२२ : फिफा विश्वकरंडक स्पर्धेमध्ये अर्जेंटिनाने ३६ वर्षांनंतर जेतेपद जिंकलं. फुटबॉल इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असलेल्या लिओनेल मेस्सीने विश्वकरंडक जिंकल्यानंतर आठवडाभरानंतर भारताचा माजी फलंदाज आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या मुलीसाठी एक खास भेट पाठविली आहे. धोनीची मुलगी झिवा हिच्यासाठी मेस्सीने एक खास अशी भेट पाठविली आहे, की ज्यासाठी त्याचे चाहते अगदी जीवाची बाजी लावायलाही तयार असतात.
काही दिवसांपूर्वीच माजी क्रिकेटपटू प्रग्यान ओझाने केलेल्या पोस्टमध्ये मेस्सीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष जय शाह यांच्यासाठी ऑटोग्राफ केलेली एक खास जर्सी पाठविल्याचं म्हटलं होतं. आता अशाच प्रकारची जर्सी मेस्सीने धोनीच्या मुलीसाठी म्हणजे झिवासाठी पाठविली आहे. झिवाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या जर्सीचा फोटो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये मेस्सीने पाठविलेली जर्सी दिसत असून, त्याचा ऑटोग्राफ म्हणजेच स्वाक्षरीही दिसत आहे.
‘वडिलांप्रमाणेच मुलीलाही आवडणारी गोष्ट’ अशा अर्थाची फोटो कॅप्शन देत हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या जर्सीवर झिवासाठी दोन शब्दांचा संदेशही लिहिण्यात आला आहे. ‘पारा झिवा’ असा हा संदेश आहे. अर्जेंटिनामध्ये वापरल्या जाणाऱ्या स्पॅनिश भाषेनुसार ‘पारा’ शब्दाचा अर्थ फॉर म्हणजेच साठी असा होतो. म्हणजेच ही जर्सी झिवासाठी आहे, असं या संदेशामध्ये म्हटलं आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील