परीक्षेदरम्यान अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना वापरता येणार लोकल

नवी दिल्ली, १२ सप्टेंबर २०२०: मागच्या महिन्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही असा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला होता. राज्य सरकारसाठी देखील हा एक मोठा पेच प्रश्न बनला होता. मात्र, अंतिम निर्णय विद्यार्थ्यांच्या बाजूनं लागल्यानं विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला होता. आता अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आणखीन एक दिलासा देणारी बातमी समोर आलीय. अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आता मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
                                                                                                                              केंद्रातील रेल्वे मंत्रालयाकडून विद्यार्थ्यांसाठी ही दिलासादायक परवानगी मिळाली आहे. सध्या कोरोनाचं संकट राज्यावर पसरलेलं दिसत आहे. या पार्श्वभुमीवर मुंबईत केवळ अत्यावश्यक सेवेसाठी लोकल धावत आहेत. मात्र इतर प्रवाशांसाठी लोकलमध्ये मज्जाव करण्यात आला आहे. असं असलं तरी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा दरम्यान ये-जा करण्यासाठी लोकलचा वापर करता येणार आहे. विद्यार्थी ओळखपत्र तसंच हॉल तिकीट दाखवत लोकलने प्रवास करु शकणार आहेत.
                                                                                                                                     काय आहेत निर्देश
                                                                                                                              ओळखपत्र आणि हॉल तिकीटच्या आधारे विद्यार्थ्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल. विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी काही महत्त्वाच्या स्थानकांवर अतिरिक्त बुकिंग काऊंटर्स सुरु केली जाणार आहेत अशी माहितीही मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. रेल्वेने इतरांना स्थानकांवर गर्दी करु नका असं आवाहन करताना प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यास सांगितलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा