बारामती, दि.३०एप्रिल २०२० :
ग्रामीण भागातील चिंच आज निमगाव केतकी मधील २०० च्यावर महिलांना घर बसल्या रोजगार देत आहे.
हा उद्योग कोरोना व्हायरस प्रतिबंधक उपाय योजनेतून, लॉकडाऊनच्या काळात गोर-गरीब मजूर महिलांच्या जीवनाचा आधार बनला आहे.या चिंच उद्योगाची निमगाव केतकी पंचक्रोशीत चांगलीच चर्चा आहे.निमगाव केतकीचे माजी उपसरपंच अशोक गुंडीबा मिसाळ,शेतकऱ्यांच्या शेतात बांधावर जाऊन चिंचेच्या झाडावरील चिंच विकत घेतात. ती झोडपुन, सोलून ठोक बाजारात व्यापाऱ्यांद्वारे विकली जाते. अशोक मिसाळ दरवर्षी चिंचेच्या हंगामात चिंच विकत घेऊन ती सोलून चिंचोका,पांबा, शिर आणि गर वेगळी करतात. नंतर ती बार्शी येथील व्यापाऱ्यास विकून स्वत:चा व्यवसाय करतात. यंदा मात्र कोरोनातील लॉकडाऊनचा परिणाम या व्यवसायावर झाला आहे.
लॉकडाऊनच्या नियमानुसार संचारबंदी ,जमावबंदी, सोशल डिस्टंसिंग, तोंडाला मास्क बांधणे, वाहतुकीची अडचण असे अनेकनियम पाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे आता प्रत्येक चिंच फोडणाऱ्या महिला मजुराच्या घरी चिंच पोहचती करुन, फोडलेली चिंच गोळा केली जाते. ७ रुपये किलो या दराने चिंच फोडण्यास दिली जाते. एक महिला दररोज घर बसल्या ३०ते ३५ किलो चिंच फोडते. त्या फोडलेल्या चिंचेचे मोजमाप घरीच घेऊन रोख मजुरी दिली जाते. लॉकडाऊन मुळे ट्रान्सपोर्ट बंद आहे.आजपर्यंत २५ते ३० टन चिंच फोडून बार्शी येथील वेअर हाऊसमध्ये साठवली जात आहे. मार्केट मध्ये पुढील दर कसा मिळतो हे सांगता येत नाही.सरासरी एक किलो चिंचेस सध्या ३०ते ३५ रुपये निव्वळ खर्च होत आहेत. पाऊस आला तर चिंचेचा रंग काळपट होतो. त्यामुळे तोटा होण्याची दाट शक्यता असते.
देशात सर्वजण लॉकडाऊनच्या काळात शासनास मदत करत आहेत. आपणही नियमांचे तंतोतंत पालन करायचे असे मनात ठरवुन काम चालु आहे. व्यवसाय करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र, या उद्योगामुळे निमगाव केतकी गावासह, वाडी वस्तीवरील गरीब महिलांना रोजगारातुन दोन पैसे मिळत असल्यामुळे समाधान वाटत असल्याचे अशोक मिसाळ यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव