पुणे शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन…! “ही केवळ अफवा” महापौरांचे स्पष्टीकरण

पुणे, १३ सप्टेंबर २०२०: काही दिवसांपूर्वी अजित पवार पुण्यामध्ये आले होते. या दरम्यान त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की पुण्यातील कोरोनाची स्थिती गंभीर होण्यामागचं कारण म्हणजे घाईघाईनं हटविण्यात आलेलं लॉकडाऊन. त्यांच्या या पुण्यातील भेटीनंतर पुण्यामध्ये लॉकडाऊन होणार अशी चर्चा सुरू झाली होती. येत्या १४ तारखेपासून हे लॉकडाऊन सुरू होणार असं चर्चा पुणेकरांमध्ये सुरू होती. मात्र, असं काहीही नसल्याचं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलंय. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

सध्या पुणे जिल्हा राज्यातच नव्हे तर देशात देखील सर्वात प्रभावित जिल्हा ठरला आहे. पुण्यानं २ लाखाचा टप्पा ओलांडलाय. कोरोनाचा एवढा मोठा आकडा देशातील कोणत्या जिल्ह्यात बघण्यास मिळालेला नाही. काल जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार सध्या पुणे जिल्ह्यात २,१५,९७५ रुग्ण सापडले आहेत. तर १,७०,८०० रुग्ण बरे देखील झाले आहेत. कोरोनाची ही आकडेवारी पाहता लॉक डाऊन विषयी पुन्हा चर्चा रंगली होती.

याबाबत स्पष्टीकरण देताना मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, ‘पुणे शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार असल्याची माहिती वृत्तवाहिन्यांच्या जुन्या बातम्यांच्या क्लिप्स व्हायरल करुन पसरवली जात आहे. या माहितीत कोणतेही तथ्य नसून पुणे महापालिका आणि प्रशासनाच्या पातळीवर असा कोणताही विचार नाही. आपल्यास असे संदेश आल्यावर ते पुढे पाठवण्याचे टाळावे. ‘या बरोबरच पुणे महानगरपालिकेनं देखील मुरलीधर मोहोळ यांचं हे ट्विट शेअर करत याबाबत पुष्टी केली आहे.

पुणे जिल्ह्याची सध्या स्थिती

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या २,१५,९७५ झाली आहे. १,७०,८०० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अॅक्टीव रुग्ण संख्या ४९,३१७ आहे. पुणे जिल्हयात कोरोना बाधीत एकुण ४,८५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचं प्रमाण २.२५ टक्के इतकं आहे. पुणे जिल्हयामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ७९.०८ टक्के आहे.

पुणे विभाग

विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ३,१५,८६० झाली आहे. विभागात २,३४,४२१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अॅक्टीव रुग्ण संख्या ७३,२६६ आहे. विभागात कोरोना बाधीत एकुण ८,१७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण २.५९ टक्के इतकं आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ७४.२२ टक्के आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा