लॉक डाऊन कायम पण अनेक गोष्टी सुरू होणार: उद्धव ठाकरे

मुंबई, दि. २८ जून २०२० : ३० जून नंतर राज्यामध्ये लॉकडाऊन संपणार आहे. या पार्श्वभूमीवर जनतेला संबोधित करण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी संपर्क साधला. ३० जून नंतर लॉकडाऊन उठणार का हा प्रश्न सर्वांच्याच मनात उठत होता. तसेच जर लॉकडाऊन काढले तर पुढील काळात कामकाजाचे स्वरूप कसे असेल याबाबत देखील प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये होते याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय म्हटले आहे ते पाहूया.

वरील दोन्ही प्रश्नांची उत्तरे उद्धव ठाकरे यांनी नाही अशी दिली आहेत. लोकडॉऊन सुरूच राहणार का याबाबत देखील स्पष्टता त्यांनी दिली नाही त्याच बरोबर लॉकडाऊन उठवले जाणार का यावर देखील त्यांनी स्पष्ट सांगितले नाही ते म्हणाले की, “३० जूनला लॉकडाऊनची मुदत संपते आहे. पुढे काय हा प्रश्न तुमच्या मनात असेल. ३० जून नंतर लॉकडाऊन उठणार का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे तसंच हे सगळं असंच सुरु राहणार का? तर त्याचंही उत्तर नाही असंच आहे. सध्या आपली अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. आपण अर्थचक्राला गती देण्यासाठी काही गोष्टी सुरु करतो आहोत. सगळं सुरु केलं म्हणून परिस्थिती सुरळीत झाली असं समजू नका नाहीतर कोरोना आ वासून बसला आहे. आपलं सरकार काळजीवाहू सरकार नाही मात्र महाराष्ट्राला तुमची काळजी आहे.”

कोविड -१९ च्या काळामध्ये अनेक सण आले व गेले यादरम्यान महाराष्ट्रातील जनतेने विशेष सहकार्य केले आहे. यासाठी सर्व धर्मातील लोकांचे त्यांनी आभार मानले आभार मानताना त्यांनी म्हटले की, “सर्व धर्मीयांचे मी आज आभार मानतो आहे. कारण कोरोनाची शिमग्यानंतर बोंब सुरु आहे. त्यानंतर जे काही सण आले ते लोकांनी साजरे केले असं मी म्हणणार नाही. मात्र सरकारने घालून दिलेल्या नियमांनुसार त्यांनी सण साजरे केले. दहीहंडीचा उत्सव रद्द करण्यात आला. ईद साजरी करण्यात आली तीही घरच्या घरी. आता गणेशोत्सव साजरा होणार आहे त्यात सार्वजनिक मंडळांनीही सरकारने घालून दिलेले निर्देश कोणत्याही अटी न घालता मान्य केले आहेत. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानत आहे.”

लॉकडाऊन हटवल्यामुळे कोविड -१९ चा प्रभाव वाढला आहे हे त्यांनी यावेळेस मान्य केले. ते म्हणाले की, “आपण काही गोष्टी शिथिल केल्या. त्यामुळे लोकांची ये-जा वाढल्याने रुग्णांची संख्याही वाढली. ही संख्या वाढल्याने आपण टेस्टची संख्याही वाढवली आहे, असं सांगतानाच करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आपण चेस द व्हायरस ही मोहीम मुंबईत राबवली. व्हायरस पोहोचण्याच्या आत आपण आपलं आरोग्य पथक तिथे पोहोचायचं. आता चेस द व्हायरस ही मोहीम संपूर्ण राज्यात राबवली जाणार आहे.”

यावेळी मुख्यमंत्र्यांनी बळीराजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना बोगस बियाणे देऊन त्यांची फसवणूक करणाऱ्यांना सोडणार नाही. त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार. तसेच त्यांच्याकडून भरपाईही मिळवून घेणार. कुणीही येऊन शेतकऱ्यांना लुटण्याासाठी हे बेभरवश्याचं सरकार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा