बारामती, दि. १३ जून २०२० : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी शासनाने निर्बंध लावले. यामध्ये एसटी बसची वाहतूक देखील बंद करण्यात आली होती. मागील महिन्यात छत्तीसगढ व मध्यप्रदेश या परराज्यातील मजूर व चाकरमान्यांना त्यांच्या राज्यात शासनाने जाण्याची परवानगी दिल्यावर त्याच्या वाहतुकीची जबाबदारी पार पाडत एसटी महामंडळाला चांगला महसूल मिळवून दिला आहे.
बारामती शहर व तालुक्यातील परराज्यातील कामगारांना शासनाने कोरोना संसर्गाच्या धर्तीवर खबरदारी म्हणुन त्यांच्या घराकडे पाठवण्याची महत्वाची जबाबदारी एसटी महामंडळाकडे दिल्यावर बारामती एसटी आगाराने दि. ११ मे ते ३१ मे या कालावधीत परराज्यातील मजूर व श्रमिक कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर सुरक्षित सोडण्याचे काम केले आहे. यासाठी बारामती एसटी अगराच्या १६७ बस गाड्या या कामी वापरण्यात आल्या आहेत. या बसच्या ३३४ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. यासाठी २ लाख ८४ हजार ३१० किलोमीटरचा प्रवास केला आहे. यामधून एसटी महामंडळाला १ कोटी ९० लाख ५० हजार ९६९ रुपये एवढा महसूल मिळाला आहे. एसटी महामंडळाने ३६७४ प्रवशांनी प्रवास केला आहे.
बारामती आगराने कोरोनासारख्या संसर्गाच्या काळात देखील या मजुरांना त्यांच्या घरी सुखरूपपणे पोहचवण्याचे काम केले आहे. यासाठी विभाग नियंत्रक पुणे व यंत्र अभियंता बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती आगराने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.याचे सर्व श्रेय पर्यवेक्षक,चालक,वाहक,यांत्रिक, प्रशासकीय कर्मचारी याचे आहे असे आगर प्रमुख अमोल गोंजारी यांनी सांगितले.
मध्यप्रदेश व छत्तीसगढ या राज्यात प्रवास करताना चालकांना अत्यंत खडतर प्रवास करावा लागला यामध्ये नवीन भाग ,रस्ते ,कोरोना संसर्गाचा प्रादुर्भावाचा धोका,अन्न,पिण्याचे पाण्याची कसलीही सोय नसताना चालकांनी आपल्या कर्तव्य प्रति जागृत राहून सुरक्षित प्रवास केला असे गोंजारी यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव