लोहगाववाघोली रस्ता अतिक्रमणमुक्त; वाहतूक कोंडीतून सुटका

45
लोहगाव वाघोली रस्ता अतिक्रमणमुक्त; वाहतूक कोंडीतून सुटका
लोहगाव वाघोली रस्ता अतिक्रमणमुक्त होणार

Lohegaon-Wagholi road encroachment free : लोहगाव-वाघोली रस्त्यावर अखेर महापालिकेने धडक कारवाई करत अतिक्रमण हटवले आहे. रस्त्याच्या कडेला झालेली अतिक्रमणे आणि अनियमितपणे उभी राहणारी वाहने यामुळे हा रस्ता वाहतूक कोंडीत हरवला होता. मात्र, महापालिकेने कारवाई करत सुमारे २० हजार स्क्वेअर फूट पक्क्या स्वरूपाचे बांधकाम जमीनदोस्त केले. त्यामुळे आता रस्ता मोकळा झाला असून वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका झाली आहे.

महापालिकेने प्रथमच मोठा फौजफाटा घेऊन ही कारवाई केली. जेसीबी आणि जाँ कटरच्या साहाय्याने पत्राशेड आणि आरसीसी बांधकाम हटवण्यात आले. त्यामुळे रस्ता मोठा दिसत असून लवकरच पक्क्या स्वरूपाचा रस्ता होणे अपेक्षित आहे.

लोहगाव-वाघोली रस्त्यावर स्मशानभूमी ते संतनगर येथील पेट्रोलपंपापर्यंत अतिक्रमणधारकांनी रस्त्याच्या कडेने १५ फूट अतिक्रमण करून दुकाने थाटली होती. त्यामुळे दोन वाहने ये-जा करण्यास रस्ता पुरेसा नव्हता. परिणामी, येथे तासन्तास वाहतूक कोंडी होत होती. आमदार बापूसाहेब पठारे यांनी पाहणी करून नगररचनेप्रमाणे अतिक्रमणधारकांनी रस्ता मोकळा करावा, अशी सूचना केली होती. त्यानुसार, महापालिकेने ही कारवाई केली.

या कारवाईदरम्यान जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण हटवताना बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. आमदार बापूसाहेब पठारे हे या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. गेल्या मंगळवारी देखील बस स्टॉप, वॉटर पार्क रस्ता, डी. वाय. पाटील कॉलेज रस्त्यावरील स्टॉलवर कारवाई झाली होती.

रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारी बांधकामे आणि दुकाने यांना महापालिकेने नोटीसा दिल्या होत्या. त्यानुसार आज ही धडक कारवाई झाली.

लोहगाव बसस्थानकाकडून चिर्के कॉलनी, डी. वाय. पाटील कॉलेज तसेच वडगाव शिंदेला जोडणाऱ्या मार्गातील गणपती चौकात रस्त्याच्या दोन्ही बाजूने अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे येथे सतत वाहतूक कोंडी होत असते.

जुन्या हद्दीत एकाच बाजूला अतिक्रमण कारवाई झाली आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या दुसऱ्या बाजूला देखील कारवाई अपेक्षित होती. मात्र, ती आज झाली नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, उर्वरित बाजूला देखील लवकरच कारवाई करण्यात येईल. त्यामुळे दुसऱ्या बाजूच्या अतिक्रमणधारकांना धास्ती बसली असून अतिक्रमण काढण्यास वेळ मिळाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा