मणिपूरच्या मुद्दयावरून लोकसभेचे कामकाज पुन्हा विस्कळीत, दुपारी २ वाजेपर्यंत सभा तहकूब

नवी दिल्ली, ३१ जुलै २०२३ : गेल्या काही दिवसांप्रमाणेच मणिपूरच्या मुद्दयावरून सोमवारी लोकसभेचे कामकाज ठप्प राहिले. विरोधी सदस्यांच्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजून १५ मिनिटांपर्यंत तहकूब करण्यात आले. कामकाजाच्या प्रारंभी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीत उपस्थित मलावी प्रजासत्ताकच्या संसदीय शिष्टमंडळाचे स्वागत केले, तसेच त्यांना यशस्वी आणि आनंददायी राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

संसद सदस्यांनीही भेट देणाऱ्या संसदीय शिष्टमंडळाचे टेबल थोपटून स्वागत केले. यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू करताच विरोधी सदस्यांनी मणिपूरच्या मुद्दयावर लवकरात लवकर चर्चा करण्याची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तराची मागणी करत गदारोळ सुरू केला.

अनेक विरोधी खासदार हातात फलक घेऊन लोकसभा अध्यक्षांच्या चेअर जवळ पोहोचले आणि घोषणाबाजी करू लागले. गोंधळादरम्यान, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार निशिकांत दुबे आणि इतर काही सदस्यांच्या पुरवणी प्रश्नांना उत्तरे दिली. बिर्ला यांनी विरोधी सदस्यांना घोषणाबाजी थांबवून सभागृहाचे कामकाज चालू देण्याचे आवाहन केले. मात्र, गदारोळ न थांबल्याने त्यांनी सभागृहाचे कामकाज सकाळी ११:१५ ते दुपारी २:१५ वाजेपर्यंत तहकूब केले.

काँग्रेस आणि विरोधी आघाडी ‘इंडिया’ (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुझिव्ह अलायन्स) मधील इतर घटक पक्ष पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मणिपूरमधील जातीय हिंसाचाराच्या मुद्दयावर संसदेत निवेदन देण्याची मागणी करत आहेत आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज आतापर्यंत विस्कळीत झाले आहे. मणिपूर हिंसाचारावर संसदेत सुरू असलेल्या गतिरोधाच्या दरम्यान काँग्रेसने बुधवारी लोकसभेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला होता, जो सभागृहात चर्चेसाठी मंजूर करण्यात आला होता. त्यादिवशी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून या प्रस्तावावर चर्चेची तारीख ठरवणार असल्याचे सांगितले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा