लोकसभेच्या निवडणुका महिना-दीड महिन्यात होतील, प्रकाश आंबेडकर यांचे विधान

5

औरंगाबाद, १० ऑगस्ट २०२३ : पुढच्यावर्षी (२०२४) लोकसभा निवडणुका होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विरोधकांची इंडिया आघाडीही तयार झाली आहे. या इंडिया आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपने एनडीएचे पुनरुज्जीवन केले आहे. त्यामुळे आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या निवडणुकीवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठे विधान केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

प्रकाश आंबेडकर औरंगाबादमध्ये आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. लोकसभेच्या निवडणुका महिना दीड महिन्यात होतील. दीड महिन्यानंतर विचारा कशा काय होतील? त्यावेळी सांगतो. आम्ही लोकसभा निवडणुकीच्या तयारी लागलो आहोत. आम्ही भाजपच्या विरोधात लढू,आमचे उमेदवार उभे करू असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

यावेळी त्यांनी महाविकास आघाडीशी आमचा संबंध नसल्याचे म्हटले आहे. शिवसेनेसोबत आमची युती आहेच. महाविकास आघाडीशी आमचा संबंध नाही. त्यामुळे निवडणुकीत काय करायचे हे महाविकास आघाडीने त्यांचे त्यांनी ठरवायचे आहे.आम्ही शिवसेनेसोबत आहोत, त्यांनी त्यांचे पाहावे. आम्ही का डोके लावावे? आम्ही का आमचा बीपी वाढवून घ्यावा? आमची आघाडी शिवसेनेसोबत आहे. आमचा समझौता शिवसेनेसोबत होईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा