महाराष्ट्राचा लोकनेता…गोपीनाथ मुंडे

पुणे, १२ डिसेंबर २०२०: महाराष्ट्राचा लोकनेता, सर्वसामान्य जनतेचा बुंलद अवाज, भाजपच्या सभेला गर्दी खेचणारे वक्ते व जनतेचा पाठिंबा असलेले महाराष्ट्र राज्यातील नेते व्यक्तिमत्व म्हणजे गोपीनाथ मुंडे. ते महाराष्ट्राचे माजी आमदार, महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे राजकीय नेते होते. महाराष्ट्राच्या राजकारणात ते एक प्रबळ राजकीय पुढारी समजले जात होते.त्यांना भाजपमधील भूमिगत स्तराला काम करणारा नेता असेही म्हटले जाते. राष्ट्रीय पातळीवरही भाजपमध्ये नेते म्हणून गोपीनाथ मुंडेची ओळख होतीे.

गोपीनाथ मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील नाथ्रा या गावी ता. परळी, जि. बीड एका सामान्य शेतकरी कुटुंबात १२ डिसेंबर, इ.स. १९४९ रोजी झाला.वडील पांडुरंग आणि आई लिंबाबाई मुंडे हे त्यांचे आई वडील. मुंडे कुटुंब पंढरपूरच्या वारीत अनेक वर्षे सहभागी होते. अखंड वारी करणारे वडील पांडुरंग आणि आई लिंबाबाई मुंडेच्या प्रभावाने गोपीनाथ मुंडे यांनी वयाच्या १४ व्या वर्षी पंढरपूरची वारी चालत जाऊन केली. त्यानंतर सात वर्षे वारी केली.

मराठवाड्यात त्या वेळी श्रीक्षेत्र भगवानगडचे महंत श्री संत भगवानबाबा गडकर महाराज यांच्या अध्यात्म्याचा बोलबाला होता. आई-वडील भगवानबाबांचे कीर्तन ऐकण्यास गोपीनाथलाही घेऊन जात. हे सर्व ऐकून मुंडेच्या मनावर आध्यात्मिक परिणाम झाला. त्यांच्या घरात बेताची परिस्थिती होती. इ.स. १९६९ मध्ये पाण्डुरंगरावांचे अकाली निधन झाले, पण त्यांच्या आई व गोपीनाथ मुंडे यांचे थोरले बंधू पंडितअण्णा मुंडेनी त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. भाऊ पंडितअण्णा यांनी स्वतःचे शिक्षण सोडून गोपीनाथ मुंडे यांचे शिक्षण पूर्ण केले. गोपीनाथ मुंडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हापरिषदेच्या शाळेत तर बी. कॉम. पर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण अंबेजोगाई येथे झाले.

गोपीनाथ मुंडे इ.स. १९६९ मध्ये अंबेजोगाई येथील योगेश्‍वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानन्द तीर्थ महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षात होते. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ते पुढील शिक्षणासाठी पुण्याला गेले.

गोपीनाथ मुंडे यांचे धाकटे भाऊ व्यंकट मुंडे हे आहेत. २१ मे, इ.स. १९७८ ला त्यांचे लग्न प्रमोद महाजनांच्या भगिनी प्रज्ञा महाजन यांच्याशी आंबेजोगाईला झाले. गोपीनाथ मुंडे यांना पंकजा पालवे-मुंडे, प्रीतम मते-मुंडे आणि यशश्री मुंडे या तीन मुली आहेत. त्यांचे घराणे राजकीय नसल्याने त्यांना घरून कुठलाही राजकारणाचा वारसा नव्हता. संघर्ष करीत ते लोकसभेचे सदस्य झाले. तथाकथित उच्चवर्गीयांपुरत्या मर्यादित असलेल्या भाजपला तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचे काम मुंडे यांनी केले. १२ डिसेंबर, इ.स. २०१० रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांचा गौरव लोकनेता (लोकनायक) असा केला होता.

भारतीय जनता पक्षाचे सदस्य होते त्यांनी इ.स. २००९ पासून भारताच्या लोकसभेत बीड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.तसेच भारतीय जनता पक्षाचे (भाजप) लोकसभेतील उपनेते म्हणून ही होते. लोकसंपर्क, अन्यायाविरुद्ध संघर्षाची नुसतीच तयारी नव्हे तर जिद्द, नवा विचार, नवे तंत्रज्ञान एकूणच जे नवे चांगले ते हवे, असा उत्साह असलेल्या गोपीनाथ मुंडे या तरुणाने भाजपला जनमानसात स्थान मिळवून दिले आणि विशेषतः उपेक्षित-शोषित वर्गात एक विश्वास निर्माण केला, असे समजले जाते. त्यांना राजकारणातील अनपेक्षितपणा, अपयश आणि जीवघेणी स्पर्धा याचा सामना करावा लागला.

पण, या सर्व संघर्षाला पुरून उरला तो हा लोकनायक. २०१४ ला भाजपला एक हाती सत्ता आली आणि अवघ्या तीन महिन्याच्या आतच ३ जून २०१४ ला त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात त्यांचे निधन झाले. संपूर्ण महाराष्ट्राला पोरकं करुन हा लोकनेता गेला. पण, त्यांच्या गेल्यानंतर आजही एक प्रश्न नेहमी उपस्थित होतो की, गोपीनाथ मुंडे यांचा अपघात झाला की घात?

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा