लोणावळ्यात पावसाचा धुमाकूळ शाळांना दोन दिवसांची सुट्टी, जनजीवन विस्कळीत!

“Heavy Rains Lash Lonavala: Two-Day School Holiday Declared, Daily Life Disrupted!”

लोणावळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा वाढता जोर लक्षात घेता लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने पालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या शाळांना २० आणि २१ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सततच्या पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. कार्ला आणि सदापूर या भागांत तर नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. असाच पाऊस कायम राहिल्यास नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची भीती आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवसांसाठी घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. पावसाने लोणावळा शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून, वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. याशिवाय, पर्यटन व्यवसायावरही या पावसाचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. शाळांना दिलेल्या सुट्टीमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, पालकांनीही समाधान व्यक्त केले आहे. शाळा व्यवस्थापनालाही सर्व महत्त्वाचे अभिलेख सुरक्षित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे