आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी लोणावळा नगरपालिकेत प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या निवडणुकीत एकूण २७ सदस्य निवडले जाणार असून, पालिकेमध्ये १३ प्रभाग असणार आहेत. यामध्ये १२ प्रभाग दोन-सदस्यीय, तर भुशी रामनगर (प्रभाग क्र. १३) हा एकमेव प्रभाग तीन सदस्यांचा असणार आहे.
सोडतीनुसार, अनुसूचित जातीसाठी (SC) चार प्रभाग आरक्षित झाले आहेत. यात प्रभाग क्रमांक ३ (वलवण), ४ (रेल्वे विभाग), ८ (लोणावळा बाजार) आणि ९ (लोणावळा गावठाण) यांचा समावेश आहे. अनुसूचित जमातीसाठी (ST) प्रभाग क्रमांक ११ (खंडाळा) आरक्षित झाला आहे. यामुळे या पाच प्रभागांमध्ये आरक्षित प्रवर्गातूनच उमेदवारीसाठी चुरस पाहायला मिळेल.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) महिलांसाठी चार आणि सर्वसाधारण मागास प्रवर्गासाठी तीन प्रभाग आरक्षित झाले आहेत. यासोबतच, सात जागा महिलांसाठी सर्वसाधारण गटातून आरक्षित झाल्या असून, आठ जागा कोणत्याही आरक्षणाशिवाय सर्वसाधारण गटासाठी खुल्या ठेवण्यात आल्या आहेत.
या महत्त्वाच्या सोडत प्रक्रियेसाठी प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख आणि मुख्याधिकारी अशोक साबळे यांची उपस्थिती होती. या आरक्षणामुळे अनेक इच्छुकांच्या राजकीय गणितांना नवी दिशा मिळाली आहे, तर काही ठिकाणी प्रबळ दावेदारांना आता आपल्या प्रभागांमध्ये नव्या समीकरणांचा सामना करावा लागणार आहे. लोणावळ्याच्या स्थानिक राजकारणावर या सोडतीचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे














































