लोणावळ्यात पैशांचा बोलबाला कार्यकर्त्यांना डावलून ‘सग्यासोयऱ्यां’ना उमेदवारी!

लोणावळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत यंदा घराणेशाही, पैसा (एम फॅक्टर) आणि पक्षीय निष्ठांची पायमल्ली हेच प्रमुख घटक ठरले आहेत. मनसे वगळता सर्वच पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी, पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून ऐनवेळी आयात केलेल्या किंवा नेतेमंडळींच्या जवळच्यांना (सग्यासोयऱ्यां) उमेदवारी दिल्याने अनेक इच्छुक नाराज झाले आहेत. या असंतोषाचा सूर थेट पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचला असून, अनेक जणांनी थेट अपक्ष अर्ज भरून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

उमेदवारी वाटपात ‘पैसा’ (एम फॅक्टर) मोठ्या प्रमाणात चालल्याने, सक्षम असूनही अनेक कार्यकर्त्यांना नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाचीही उमेदवारी नाकारली गेली. जुने चेहरे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य (घराणेशाही) रिंगणात उतरले आहेत, तर सामान्य कार्यकर्ता उपेक्षित राहिला आहे. भाजपमध्ये नगराध्यक्षपदासाठी सुरेश गायकवाड यांच्या चर्चेनंतर माजी नगराध्यक्ष अमित गवळी यांचे सहकारी गिरीश कांबळे यांना आयत्यावेळी उमेदवारी मिळाली. राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये आरोही तळेगावकर या सक्षम उमेदवार असताना राजेंद्र सोनवणे यांना संधी देण्यात आली.

या गोंधळात, रिपाइंचे सूर्यकांत वाघमारे यांनी दोन्ही पक्षांकडून उमेदवारी न मिळाल्याने अखेरीस शिंदेसेनेकडून अर्ज भरला. त्यांनी स्वतः प्रचारसभेत आर्थिक बाबींचा विचार झाला असल्याचे स्पष्ट केले.

माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांनी स्वतः तसेच त्यांच्या मुलीनेही अर्ज भरला आहे. प्रभाग क्र. ‘सात-ब’मध्ये सुरेखा जाधव यांच्या विरोधात माजी नगराध्यक्ष मारुती तिकोने यांच्या पत्नी आरती तिकोने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय, राजू चौधरी आणि शादान चौधरी यांची मुलगी सना चौधरी, माजी नगरसेविका सिंधू परदेशी, माजी नगराध्यक्ष नारायण पाळेकर यांच्या पत्नी लक्ष्मी पाळेकर, भाजपचे माजी अध्यक्ष अरुण लाड यांच्या पत्नी अश्विनी लाड, माजी नगरसेविका यांचे पती मुकेश परमार अशा अनेक सग्यासोयऱ्यांनी अर्ज भरल्यामुळे ही निवडणूक यंदा घराणेशाही विरुद्ध कार्यकर्त्यांचा असंतोष अशी चुरशीची होणार आहे. काही इच्छुकांनी तिकीटांसाठी ‘पलटूराम’ची भूमिका घेतली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे