लोणी देवकर परिसरात दिवसाढवळ्या गौण खनिजावर डल्ला….

मंडल अधिकाऱ्यांना हाताशी धरून तस्करांचा हौदोस….प्रशासनाच्या कारभारावर शंका उपस्थित..

इंदापूर, दि. १४ जुलै २०२०: इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर औदयोगिक वसाहतीमधील पडीक जागेतील सध्या मुरूम तस्करीने थैमान घातले आहे. स्थानिक प्रशासनाच्या आशीर्वादाने गौण खनिज माफिया हौदोस घालत आहेत. सध्या संपूर्ण जगात कोरना सारख्या महामारीने थैमान घातले असून सगळीकडे लॉकडाउन असतानाही लोणी देवकर परिसरात मुरूम तस्करी दिवसाढवळ्या सुरू आहे.

गौण खनिज तस्करीवर महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांचा अंकुश राहिला नसून या तस्करीतून मिळणाऱ्या पैशामुळे प्रशासनही वाळू माफियांशी हातमिळवणी करताना दिसून येत आहे. यामुळे गौण खनिज तस्करांचे राजकीय संबंध व पोलीस प्रशासनाशी असलेली हातमिळवणी झाली आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये धनदांडग्या गौण खनिज तस्करांनी मंडळ अधिकाऱ्यांना हाताशी धरून दिवसाढवळ्या जेसीबी आणि पोकलेन च्या साह्याने हजारो ब्रास मुरमावर डल्ला मारत आहेत.

याबाबत जागरूक नागरिकांनी आवाज उठविल्यास त्यांना या धनदांडग्या माफियांकडून धमक्या दिल्या जातात तर काहींना चिरीमिरी देऊन गप्प केले जात असल्याचे प्रकार देखील घडत आहेत. मंडल अधिकाऱ्यांना याबाबत काही विचारणा केली असता ते याबद्दल बोलण्यास टाळाटाळ करीत असल्याचे देखील स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच स्थानिक पत्रकारांनी याबाबत मंडळ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी बोलणे टाळून संबंधित तस्करांना याबाबत सांगितले आणि त्या तस्करांनी पत्रकारांना धमक्या दिल्या असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळेच की काय या प्रशासनामुळे गौण खनिज तस्कर आन्ना शासनाचा महसूल बुडवून कमी वेळात जास्त पैसा मिळवण्याची जणू स्पर्धाच लागली आहे.

त्यामुळे सदरची गौण खनिज तस्करी आणि स्थानिक मंडलाधिकारी यांच्यावर योग्य कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा