लोणी काळभोर: चोरट्यांनी गुगल पेचा वापर करुन रुग्णालयात उपचाराचे पैसे अदा केल्याचा धागा पकडुन, पुणे-सोलापुर महामार्गावर उरुळी कांचन व खडकी येथील दोन एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन जणांच्या टोळीस लोणी काळभोर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सोलापूर जिल्हातुन मंगळवारी (ता. 17) रात्री उशीरा अटक केली आहे.
गणेश बाळु लोकरे (वय- 23, रा. वडोळी आडेगाव ता. माढा जि. सोलापुर) हा एटीएम फोडणाऱ्या टोळीचा प्रमुख असुन, लोणी काळभोर पोलिसांनी गणेश लोकरेसह संकेत ज्ञानेश्वर काकडे (वय- 23, रा. सावडी ता. करमाळा जि. सोलापूर) व किरण दादा गाडे (वय- 24, रा. खडकपुरा ता. करमाळा जि. सोलापूर) या तीन जणांना अटक केली आहे. वरील तीनही आरोपींनी पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) व खडकी (ता. दौंड) येथील दोन एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची कबुली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथील स्टेट बॅंकेचे एटीएम गॅस कटरच्या साह्याने फोडण्याचा प्रयत्न सहा (ता. 11) दिवसापुर्वी रात्रीच्या वेळी झाला होता. तर त्यानंतर तीन दिवसांनी खडकी येथील एका बॅंकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख राजू महानोर व त्यांच्या सहकाऱ्यांनी उरुळी कांचन येथील बॅंकेच्या सीसीटिव्हीची पाहणी केली असता, पोलिसांना मोटारसायकलवरुन आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी वरील गुन्हा केल्याची बाब निष्पन्न झाली. यावर महानोर यांनी खडकी येथील बॅंकेची पाहणी केली असता, उरुळी कांचन प्रमाणेच तीन जणांच्या टोळक्याने खडकी येथील एटीएमही फोडण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांना आढळून आले.
त्याच दरम्यान पोलिसांना चोरट्यांनी गॅस कटरसाठी वापरलेला गॅस सिलेलंर बॅंकेच्या जवळ आढळुन आला. या सिलेंडरवरील कोडनंबरवरुन सिलेंडरची विक्री करणाऱ्या दुकानदाराचा पत्ता मिळवला. पोलिसांनी संबधित दुकानदाराकडे सिलेंडर घेऊऩ जाणाऱ्या तिघांची विचारणा केली असता, दुकानदाराने नावे सांगण्यास असमर्तता दाखवली. मात्र सिलेंडर घेऊन जाणाऱ्या तिघांच्यापैकी एकाच्या नाकाला मोठी जखम झाली असल्याची महत्वाची माहिती पोलिसांना दिली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी पाटस परीसरातील सर्वच खाजगी रुग्नालयात उपचार घेऊऩ जाणाऱ्या रुग्नांची माहिती घेतली असता, एका रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी एकाने नाकावर उपचार करुन घेतल्याची माहिती मिळाली. मात्र रुग्णालयात उपचार करताना रुग्णाचे नाव घेतले नसल्याचे स्पष्ट झाले. त्याचवेळी उपचार घेणाऱ्या रुग्णाने उपचाराचे पैसे गुगल पेचा वापर करुन दिल्याची माहिती महानोर यांना रुग्णालयाने दिली. हा धागा पकडत सहायक पोलिस निरीक्षक राजू महानोर, पोलिस हवालदार नितीन गायकवाड, समीर चमणशेख, सागर कडू, रोहिदास पारखे यांनी दोन दिवसात वरील तिघांना अटक केली. हवेलीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे-पाटील यांनी राजु महानोर व त्यांच्या पथकाचे अभिनंदन केले.