लखनौ सुपर जायंट्सचा घरच्या मैदानावर सलग दुसरा विजय, सनरायझर्स हैदराबादचा पाच गडी राखून केला पराभव

लखनौ, ८ एप्रिल २०२३: इंडियन प्रीमियर लीगमधील कालच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा सनरायझर्सने हैदराबादवर ५ गडी राखून विजय मिळवला. लखनौचा हा तीन सामन्यांतील दुसरा विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने १२१ धावा केल्या. हैदराबादकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक ३५ धावा केल्या. सामन्यात फलंदाजी करताना सनरायझर्स संघ बॅकफूटवर दिसत होता. लखनौने आरामात विजय मिळवला. हैदराबाद फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून आले.

मयांक अग्रवाल आणि अनमोलप्रीत सिंग यांनी एसआरएचच्या डावाची सुरुवात केली, परंतु तिसऱ्याच षटकात कृणाल पांड्याने धक्का दिला. मयांक ८ धावांवर मार्कस स्टॉयनिसच्या हाती झेल देऊन परतला. पांड्याने सलग दोन चेंडूवर दोन धक्के दिले. ८व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्याने अनमोलप्रीतला ( ३१) पायचीत पकडले, तर पुढील चेंडूवर कर्णधार मार्करामची दांडी गुल केली. कृणाल पांड्याच्या टिच्चून माऱ्याला तोड नव्हती आणि त्याने ४-०-१८-३ असा अप्रतिम स्पेल टाकला. हॅरी ब्रुककडून एसआरएचला संयमी खेळ करून धावा वाढवण्याची अपेक्षा होती, परंतु त्याला घाई नडली. रवी बिश्नोईच्या चेंडूवर पुढे येऊन फटका मारण्याच्या प्रयत्नात ब्रुक पहिल्याच चेंडूवर यष्टीचीत झाला. लखनौने ४० वर्षीय अमित मिश्राला आज त्यांच्याकडून पदार्पणाची संधी दिली. कृणाल व रवी यांच्या वळणाऱ्या चेंडूनंतर अमित मिश्रासारखा अनुभवी गोलंदाज सनरायझर्सची डोकेदुखी वाढवताना दिसला. रवी बिश्नोईने ४-०-१६-१ अशी स्पेल टाकली.

लखनौच्या फिरकीपटूंसमोर हैदराबादचे फलंदाज केवळ १२१ धावा करू शकले. अशा स्थितीत लखनौचा विजय आधीच निश्चित वाटत होता. असे असूनही संघाला यासाठी संघर्ष करावा लागला. कर्णधार केएल राहुलने ३५ धावांची खेळी खेळून संघाचा विजय निश्चित केला. मात्र, गेल्या दोन सामन्यांमध्ये स्फोटक अर्धशतके झळकावणारा काईल मेयर्स यावेळी लवकर बाद झाला, तर दीपक हुडा सलग तिसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. लखनौने ४५ धावांत २ विकेट गमावल्या होत्या.

येथून कर्णधार राहुलने क्रुणालसोबत ५५ धावांची भक्कम भागीदारी केली, ज्यामुळे हैदराबादसाठी परतीचे सर्व दरवाजे बंद झाले. या डावात कृणाल (३४) आक्रमक फलंदाजी करताना दिसला. त्याने हैदराबादच्या फिरकीपटूंना वर्चस्व गाजवण्याची कोणतीही संधी दिली नाही. उमरान मलिकने १३व्या षटकात क्रुणालला बाद केले पण तोपर्यंत १०० धावा पूर्ण झाल्या होत्या आणि सामना हाताबाहेर गेला होता. लखनौने हे लक्ष्य १६व्या षटकातच गाठले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा