पुणे, दि. १० सप्टेंबर २०२०:पुणे शहरातील पथारी विक्रेत्यांकरिता लॉकडाऊननंतर परत व्यवसाय सुरु करणे करिता सहाय्यक म्हणून खेळते भांडवल रु. १०,०००/- कर्ज स्वरुपात मा. प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहेत.
पथारी व्यावसायिकांचं हातावरचं पोट असतं. या लॉकडाऊनच्या संकटाच्या काळामध्ये त्यांना आधार देणे गरजेचे आहे. त्यामुळे मा. पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी मा. प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना निर्माण केली आहे. या योजनेच्या अनुषंगाने बैठक घेऊन पुढील प्रक्रियेचे नियोजन केले.
सदर योजनेचा पथारी व्यायसायिकांनी लाभ घेण्यासाठी प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयामध्ये मदत कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. तसेच सदर योजनेचे अर्ज फक्त ऑनलाईन स्वरुपात भरणे आवश्यक असून पथविक्रेत्यांना अर्ज करण्याची ऑनलाईन पोर्टलची लिंक http://pmavanidhi.mohua.gov.in अशी असून पथविक्रेत्यांकडे Android Mobile असल्यास त्या माध्यमातून किंवा नागरी सुविधा केंद्र/ CYBER CAFE / इतर अन्य ऑनलाईन सुविधामार्फत अर्ज करता येईल. यासाठी पथविक्रेत्यांचे मोबाईल नंबर हे आधार कार्ड लिंक केलेले असावेत. तसेच आवश्यक कागदपत्रे, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, बँकेचे पासबुक, फेरीवाला ओळखपत्र/ फेरीवाला नोंदणी प्रमाणपत्र किंवा फेरीवाला व्यवसाय करत असलेचे इतर पुरावे असणे आवश्यक आहे.
सदर कर्जावर आरबीआयच्या प्रचलित दराप्रमाणे व्याज लागू राहतील. विहीत कालावधीमध्ये कर्ज परतफेड केल्यास ७% व्याज अनुदान मिळण्यास पात्र राहतील. सदर कर्ज योजनेची सुविधा सर्व राष्ट्रीयकृत बँकेत उपलब्ध आहे. बँकांचे प्रतिनिधी व पुणे मनपा प्रशासन आणि पथारी व्यावसायिक संघटना यांच्यामध्ये योग्य तो समन्वय राखून सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त पथारी व्यावसायिकांपर्यंत पोहाचविण्यात यावा. तसेच पीएम स्वनिधी योजनेबाबत अधिक माहितीसाठी नजिकच्या पुणे मनपा क्षेत्रिय कार्यालयास संपर्क करण्यात यावा.
बैठकीस अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) शान्तनू गोयल, मुख्य समाज विकास अधिकारी सुनिल इंदलकर, उपायुक्त माधव जगताप यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे