मध्य प्रदेश, २१ जुलै २०२० : मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल केले असता मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले. मृत्यू समयी ते ८५ वर्षांचे होते .
आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी देताना लालजी टंडन यांचा मुलगा आशुतोष टंडन यांनी ट्विटरवरुन सांगितले की, त्यांनी मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता अखेरचा निरोप घेतला. आशुतोष टंडन म्हणाले की, लालजी टंडन यांचे शेवटचे अत्यसंस्कार हे सायंकाळी साडेचार वाजता लखनौच्या गुल्लाला घाटावर केले जातील.
लालजी टंडन यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले की, “श्री लालजी टंडन यांनी केलेल्या समाजसेवेच्या अथक प्रयत्नांमुळे त्यांचे स्मरण केले जाईल. उत्तर प्रदेशात भाजपाला बळकट करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी नेहमीच लोककल्याणासाठी महत्त्व दिले होते, एक प्रभावी प्रशासक म्हणून त्यांनी आपली छाप पाडली होती . त्यांच्या निधनाने सगळे दुखावले आहेत. ”
“श्री लालजी टंडन यांना घटनात्मक बाबींची चांगली जाण होती. प्रिय अटलजी यांच्याशी त्यांनी दीर्घ आणि जवळचा सहवास अनुभवला होता ,” असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी