लातूर २१ नोव्हेंबर २०२३ : कमी पाण्यामध्ये अधिक उत्पन्न देणारी रेशीम शेती शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना रेशीम शेतीविषयी माहिती देवून त्यांना रेशीम शेतीसाठी प्रोत्साहित करावे. तसेच सध्या रेशीम शेती होत असलेल्या परिसरात रेशीम शेतीचे क्लस्टर निर्मितीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘महा रेशीम अभियान 2024’ अंतर्गत रेशीम शेतीच्या प्रचार आणि प्रसारासाठी जिल्हा रेशीम कार्यालयाने तयार केलेल्या रेशीम रथाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. तुती लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून परंपरागत शेतीला फाटा देऊन शेतकऱ्यांनी रेशीम शेती करावी. पहिल्या टप्प्यात २० नोव्हेंबर ते २० डिसेम्बर याकालावधीत लातूर जिल्ह्यातील ५२ गावात हे महा रेशीम अभियान होत असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त रेशीम शेती साठी पुढे यावे असे आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले.
या कार्यक्रमाला रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवसांब लाडके, जिल्हा रेशीम विकास अधिकारी एस. बी. वराट, यशदाचे प्रशिक्षक रवींद्र इंगोले, कृषि उपसंचालक महेश क्षीरसागर, जिल्हा रेशीम कार्यालयाचे विवेकानंद पेठकर, सतीश सूरकर, संतोष पवार, रोहित देशमुख, राहुल कदम, प्रगतशील शेतकरी सिध्देश्वर कागले, शौकत शेख, चॉकीधारक आकाश जाधव यावेळी उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी : सलीम शेख