संशोधनासाठी लागणारी रसायने घ्यायची आहेत, फिल्ड स्टडीला जायचं आहे, पण खिशात पैसेच नाहीत. निधीअभावी अनेक महिन्यांपासून संशोधन थांबलंय… ही व्यथा आहे ‘महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थे’ (महाज्योती) अंतर्गत संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची. ‘सारथी’ आणि ‘बार्टी’ संस्थांच्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा पूर्ण निधी मिळत असताना, ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांची मात्र निराशा झाली आहे. त्यांना केवळ २५ जुलै ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीपुरतेच पैसे मिळाले असून, उर्वरित थकबाकीची रक्कम अद्याप मिळालेली नाही, त्यामुळे त्यांच्या भविष्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या निधीअभावी संशोधनाचा महत्त्वाचा भाग असलेल्या महागड्या रसायनांची खरेदी, आवश्यक उपकरणे आणि फिल्डवर्क थांबले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे संशोधन पुढे नेण्यात अडचणी येत आहेत. ‘महाज्योती’च्या २०२३ च्या तुकडीतील अनेक विद्यार्थी या आर्थिक आणि मानसिक त्रासामुळे हवालदिल झाले आहेत. कागदपत्र पडताळणीमध्ये वारंवार त्रुटी काढल्या जात असल्याचा आरोपही विद्यार्थी करत आहेत.
या अन्यायाविरोधात ओबीसी-व्हीजेएनटी विद्यार्थ्यांच्या संघटनेने पुढाकार घेतला असून, त्यांनी शासनाला त्वरित यावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. जर सरकारने यावर लक्ष दिले नाही, तर आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. ‘महाज्योती’चे संचालक मिलिंद नारिंगे यांनी मात्र अधिछात्रवृत्तीच्या धनादेशावर नुकतीच स्वाक्षरी झाल्याचे सांगितले आहे, ज्यामुळे लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र, ‘सारथी’ आणि ‘बार्टी’च्या धर्तीवर नोंदणी दिनांकापासून पूर्ण निधी कधी मिळणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे













































