२२ जून १९६० रोजी संस्कृत महाकवी कालिदास यांच्या स्मरणार्थ भारतीय टपाल खात्याने दोन तिकीटांचा संच वितरीत केला. त्यातील एक तिकीट कालिदासाच्या मेघदूत या लघुकाव्यावर तर दुसरे तिकीट अभिज्ञान शाकुंतल या नाटकावर आधारीत होते. शाकुंतलावर आधारीत असलेल्या तिकीटाची किंमत एक रुपया तीन पैसे होती. १९६३ साली हेच तिकीट पुन्हा वितरीत करण्यात आले त्यावेळी त्याची किंमत एक रुपया होती.
पुरा कवीनां गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः ।
अद्यापि तत्तुल्यकवेरभावादनामिका सार्थवती बभूव ॥
अर्थात: प्राचीन कवींची गणना करत असता एक कालिदास असे म्हंटल्यावर त्याच्या तुलनेचा दुसरा कवी नसल्याने करंगळी शेजारच्या बोटाला अनामिका असे नाव पडले आहे.
कालिदासाचा निश्चित काळ सांगता येत नाही. त्याने आपल्या नाटकांमध्ये व साहित्यकृतींमध्ये आपल्या नावाव्यतिरीक्त कुठलीच माहिती दिलेली नाही. परंतू काही तज्ज्ञांच्या मते कालिदास हा गुप्त संम्राट चंद्रगुप्त दुसरा म्हणजेच विक्रमादित्य याच्या दरबारात असावा. कालिदासाच्या मेघदूत या लघुकाव्यात येणार्या उज्जैयिनीच्या वर्णनावरुन तो तिथला राहिवासी असावा असे अनुमान काढले आहे.
भावकवी, महाकवी व नाटककार या तीनही भूमिका कालिदासाने यशस्वितेने वठवल्या आहेत. कालिदासाने अतुलनिय अशी साहित्यनिर्मिती करुन ठेवली आहे. त्याने कुमारसंभव व रघुवंश ही दोन महाकाव्ये, मेघदूत व ऋतुसंहार ही लघुकाव्ये आणि विक्रमोर्वशीय, मालविकाग्नीमित्र आणि अभिज्ञान शाकुंतल ही नाटके लिहिली. कालिदासाने लिहिलेल्या साहित्यात आपल्याला तात्कालीन सामाजिक जीवनाचे सुंदर प्रतिबिंब पडलेले आढळते. याचबरोबर मुळ कथानकाबरोबरच त्याने केलेले निसर्गाचे वर्णनही अतिशय रम्य आहे.
मेघदूत संस्कृत खण्डकाव्यांमध्ये सगळ्यात उच्च पातळीवर असलेले कालिदासाचे हे लघुकाव्य आहे. ह्या लघुकाव्यात केवळ १२० श्लोक आहेत. पूर्वमेघ व उत्तरमेघ अशा दोना भागात हे काव्य विभागलेले आहे.
कुबेराचा सेवक यक्ष याच्याकडुन अजाणता आगळीक घडते. कुबेर त्याला पत्नीवियोगाचा शाप देतो. तो यक्ष रामपर्वतावर येउन राहतो. विरहव्याकुळ यक्षाला आषाढाच्या पहिल्या दिवशी रामगिरीच्या शिखरावर मदमत्त हत्तीप्रमाणॆ काळाकभिन्न मेघ दिसतो. त्या मेघाबरोबर आपल्या पत्नीला आपण कुशल असल्याचा संदेश पाठवावा असे त्याच्या मनात येते. तो त्या मेघालाच आपला दूत बनवतो व आपल्या पत्नीला संदेश पाठवतो. मेघाला आपल्या घराचा मार्ग सांगताना यक्ष त्याला वाटेत काय काय दिसेल याचे वर्णन करतो. अशी अतिशय सुंदर निसर्गवर्णने या काव्यात आलेली आहेत. तिकीटावर हा यक्ष त्या मेघाला आपला संदेश देताना दाखविला आहे.
अभिज्ञान शाकुंतल कालिदासाच्या शाकुंतल या नाटकाचे वर्णन संस्कृत ग्रंथकारांनी ‘काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या शाकुन्तला ।’ असे केलेले आहे.
कालिदासाचे अभिज्ञान शाकुन्तल ही एकमुखाने गौरवलेली नाट्यकृती आहे. हे सात अंकी नाटक आहे. उपमा कालिदासस्य या उक्तीनुसार कालिदासाने उपमा या अलंकाराचा अतिशय सुंदर उपयोग केलेला आहे.
शंकुतलेची कथा महाभारताच्या आदिपर्वामध्ये येते. दुष्य़ंत व शकुंतला यांच्या प्रेमकहाणीवर आधारीत ही नाट्यकृती आहे. मुळ कथेतील दुष्यंत शकुंतलेची खटकणारी स्वभाववैशिष्ट्ये बदलून कालिदासाने आपल्या परीसस्पर्शाने त्यांची व्यक्तीमत्वे उजळून टाकली आहेत. शकुंतला व दुष्यंत यांचा गांधर्वविवाह होतो. दुष्यंत आपल्या राजधानीला परत जातो. दुर्वास ऋषी आपले स्वागत नीट न झाल्यामुळे शकुंतलेला शाप देतात की तुझ्या प्रियकराला तुझा विसर पडेल व अभिज्ञान दाखवल्यावर हा शाप नाहीसा होईल असा उ:शापही देतात. गर्भवती शकुंतला दुष्यंतासमोर जाउन उभी राहते पण दुष्यंत तिला ओळखत नाही. दु:खी अंत:करणाने शकुंतला आपल्या पित्याच्या आश्रमात परत येते. इकडे दुष्यंताला त्याने शकुंतलेला दिलेली अंगठी मिळते व त्याला शकुंतलेची आठवण येते. मग तो आश्रमात जाउन तिचा स्विकार करतो.