मित्रांच्या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न एका हॉटेल व्यावसायिकाला चांगलाच महागात पडला. महाळुंगे एमआयडीसी येथे रात्री झालेल्या एका घटनेत, हॉटेल मालकाला मारहाण करून त्याचे दुकानही तोडण्यात आले. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुशेन दादाराव गटकळ (वय ३६, निघोजे, खेड) त्यांच्या टपरीवर मित्रांसोबत जेवण करत असताना हा प्रकार घडला. आरोपी दत्ता सूर्यवंशीने जाणूनबुजून त्यांच्यासोबत असलेल्या आचाऱ्याला, ‘काल नेपाळी सण होता, तरी तू कामावर का आलास?’ असे विचारले, जेणेकरून फिर्यादीला ते ऐकू येईल. फिर्यादीने याबद्दल विचारणा केल्यावर दत्ता सूर्यवंशीने शिवीगाळ करत त्यांच्याशी झटापट केली.
या झटापटीनंतर दत्ता सूर्यवंशी त्याच्या पत्नी आणि दोन मुलांसह परत आला. त्यांच्या हातात लोखंडी रॉड आणि लोखंडी पट्टी होती. त्यांनी सुशेन गटकळ यांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्या दुकानाची तोडफोड केली.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दत्ता सूर्यवंशी (वय ४५), आदित्य सूर्यवंशी (वय २१), प्रतीक सूर्यवंशी (वय २१), एका महिला आणि एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































