संत श्री गोदड महाराजांचा महाप्रसाद कर्जत शहरातील प्रत्येकास मिळणार घरपोच

कर्जत, २९ जुलै २०२०: संत श्री गोदड महाराजांच्या जन्मोत्सवाचा आमटीचा महाप्रसाद उद्या दिनांक २९ जुलै रोजी कर्जत शहरातील प्रत्येकाच्या घरी पोहोचवला जाणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व  धार्मिक कार्यक्रम रद्द  झालेले असल्यामुळे यावर्षी कर्जतचे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराजांचा जन्मोत्सव  ही साजरा केला जाणार नाही. दर वर्षी कर्जत येथे महाराजांचे जन्मस्थळ व समाधीस्थळ या दोन्ही ठिकाणी मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा केला जातो व दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे वाटप केले जाते. मात्र यावर्षी हे दोन्ही कार्यक्रम रद्द करण्यात आले असून श्री गोदड महाराजांच्या जन्मस्थळी महाप्रसाद म्हणून कर्जतची प्रसिद्ध शिपी आमटी तयार केली जाणार असून ती कर्जत शहरातील प्रत्येक घरात वाटली जाणार आहे.

शासकीय सर्व नियम पाळून व  आरोग्याची सर्व खबरदारी घेत उद्या आमटीचे वितरण करण्यात येणार असून याचे नियोजन करण्यासाठी आज श्री गोदड महाराजांच्या जन्मस्थळी असलेल्या ध्यान मंदिरामध्ये प्रवीण दादा घुले मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली, यावेळी नियोजन करण्यात आले, याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, नगरसेवक सचिन घुले सह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

दि २९ जुलै रोजी संत श्री गोदड महाराजाचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम मंदिरात होणार नाही, त्यामुळे भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी करू नये,  प्रत्येकाने आपल्या घरीच दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी पुुजा करत फुले टाकून संत श्री गोदड महाराजांची आरती करावी असे आवाहन प्रवीणदादा घुले यांनी कर्जतकरांंना केले आहे. हा प्रसाद वाढण्या अगोदर सर्व कार्यकर्त्यांची आरोग्य तपासणी केली जाणार असून हॅन्ड ग्लोज मास्कचा वापर करत सुरक्षित सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून महाप्रसादाचे वाटप केली जाणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा