कर्ताधर्ता गमावला वारसदार नोकरीला लागला

पुण्यात ‘कर्तव्यदक्ष’ तरुणांना नोकरी! ‘महाराजस्व अभियाना’अंतर्गत हजारो नियुक्ती पत्रे वितरित

ज्या कुटुंबांनी आपल्या घरातील ‘कर्ताधर्ता’ गमावला, त्या कुटुंबांना आता शासनाकडून मोठा आधार मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज ‘महाराजस्व अभियाना’अंतर्गत राज्यात तब्बल एक हजार तरुणांना अनुकंपा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) निवड करण्यात आलेल्या पदांसाठी नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. या अभियानाचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १७ सप्टेंबर रोजी झाला.

पुणे जिल्हा प्रशासनाने या अभियानात मोठा पुढाकार घेतला. प्रशासनाने अनुकंपा तत्त्वावरील गट ‘क’ आणि ‘ड’ मधील रिक्त पदे भरण्यासाठी विशेष प्रक्रिया राबवली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पुणे जिल्ह्यात मुख्यालय असलेल्या विविध विभागांमधील गट ‘क’ मधील पदांसाठीही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेत सुमारे ७३८ पदांसाठी शिफारस करण्यात आली होती, त्यापैकी ७३२ पदे भरण्यात आली आहेत. विशेषतः पुणे जिल्ह्यात ३७५ पदे भरली जाणार आहेत, ज्यापैकी ३४१ उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी पूर्ण झाली आहे. उर्वरित पदे इतर जिल्ह्यांमध्ये भरली जातील.

राज्य सरकारने शासकीय विभागांसाठी १५० दिवसांचा विशेष कार्यक्रम आखला आहे, ज्याचा उद्देश जलद भरती प्रक्रिया राबवणे आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या ‘वारसदारांना’ आता शासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळाली आहे. हे अभियान केवळ नोकरी देणारे नाही, तर सामाजिक आधार देणारे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे