पुणे: भारतातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०० ओलांडली आहे. महाराष्ट्रात रात्री उशिरा ५ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. अशाप्रकारे, देशातील कोरोना रुग्णांची संख्या ९६ वरून १०१ पर्यंत वाढली आहे. या आजारामुळे आतापर्यंत दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोनाच्या रुग्णांच्या संख्या सतत वाढत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ३१ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे देशातील कोरनाच्या रुग्णांची संख्या १०१वर पोहोचली आहे.
सर्व आंतरराष्ट्रीय सीमा बंद
करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता भारताने सर्व आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि म्यानमार सीमेवरील प्रवासी वाहतूक आजपासून बंद करण्यात आली आहे. पुढच्या आदेशापर्यंत शेजारी देशांचा प्रवास बंद करण्यात आल्याचं गृहमंत्रालयाने म्हटलं आहे. पण सीमेवरील मोजक्याच पोस्टवर अत्यावश्यक गरजांसाठी वाहतूक सुरू राहणार आहे. भूतान, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार या देशांमधून रस्तेमार्गे होणारी प्रवासी वाहतूक १५ मार्च मध्यरात्रीपासून, तर पाकिस्तानबरोबरची सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक १६मार्च मध्यरात्रीपासून बंद करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.
कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने कोविड -१९ ला राष्ट्रीय आपत्ती घोषित केली. आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सार्क देशांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोना संकटावर चर्चा करतील.
महाराष्ट्रात ५ नवीन प्रकरणे नोंदली गेली
यापूर्वी देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या ९६ होती. रात्री उशिरा आलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्रातील आणखी ५ लोक या आजाराने ग्रस्त आहेत. यापैकी ३ महिला आणि २ पुरुष आहेत. या पाचपैकी चार जण दुबईला गेले होते, तर २१ वर्षांचा पाचवा माणूस थायलंडमधून आला आहे. यासह, महाराष्ट्रात कोरोना विषाणूमुळे पीडित लोकांची संख्या ३१ झाली आहे.
हवाई उड्डाण रद्द
करोना विषाणू पार्श्वभूमीवर एअर इंडियाने शुक्रवारी त्यांच्या आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द केल्यानंतर इंडिगोनेही आता उड्डाणे रद्द केली आहेत. इंडिगो ने १७ मार्च २०२०पासून दुबई, शारजाह व अबुधाबीची उड्डाणे रद्द करीत असल्याचे शनिवारी जाहीर केले. या तिन्ही मार्गांवर इंडिगोची मुंबईहून दररोज सहा उड्डाणे आहेत. पुढील सूचना येईपर्यंत ही सर्व उड्डाणे स्थगित ठेवण्यात येणार आहेत. एअर इंडियाने आता दुबई, मस्कत, दमम्म, दोहा, जेद्दाहच्या विमानसेवादेखील ३० मे पर्यत स्थगित केल्या आहेत. त्यामुळे सोमवारपासून या सेवा बंद होतील.